कोरोना रुग्णांवर बेकायदा उपचार, रुग्णालयांना दणका; पाम बीच रुग्णालयाला परवाना निलंबित

सुजित गायकवाड
Thursday, 24 September 2020

कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची मान्यता नसतानाही बेकायदा पद्धतीने रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेने दणका दिला आहे

नवी मुंबई, ता. 24 : कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची मान्यता नसतानाही बेकायदा पद्धतीने रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. महापालिकेने वाशीतील पामबीच रुग्णालयाचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित केला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित रुग्णालयावर कारवाई केली आहे. 

देशभरात कोविड19  या संसर्गजन्य आजाराची साथ पसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे सर्वत्र साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. या कायद्यान्वये रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा घेणे गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत काही खासगी रुग्णालयांनी कोविड19 च्या नावाखाली रुग्णांची लुट सुरू केली आहे. कोविड19 वर कोणतीच उपचार पद्धती उपलब्ध नसताना केवळ उपचार केल्याचे भासवून रुग्णांकडून लाखो रूपयांची बीले वसूल करीत आहेत.

महत्त्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

त्यामुळे महापालिकेच्या मान्यतेशिवाय कोविड19 च्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेऊ नये, असे परिपत्रक महापालिकेने काढले आहे. तरी देखील शहरातील काही खासगी रुग्णालयांनी पालिकेची परवानगी न घेता थेट कोव्हीड 19 च्या रुग्णांना सर्वसामान्य रुग्णांसोबत उपचार करण्यास सुरूवात केले आहे.

अशा पद्धतीने उपचार केल्या जात असलेल्या वाशीतील पामबीच रुग्णालयाविरोधात तक्रार आली होती. नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी याबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. पालिकेने केलेल्या चौकशीनंतर आणखिन काही रुग्णालये बेकायदा कोव्हीड 19 रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार बांगर यांनी वाशीतील पामबीच, ग्लोबल आणि ऐरोलीतील क्रिटीकेअर या रुग्णालयांना 48 तासांत कारणे द्या नोटीस बजावली होती. मात्र पामबीच रुग्णालयाने पालिकेला स्पष्टीकरण सादर न केल्याने अखेर बांगर यांनी बूधवारी रात्री उशिरा पामबीच रुग्णालयाचा परवाना येत्या 15 दिवसांसाठी निलंबित केला आहे. तसेच लवकरच ग्लोबल आणि क्रिटीकेअर रुग्णालयांवरही महापालिकेतर्फे कारवाईचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. 

महत्त्वाची बातमी : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; प्रकृती ठीक असल्याची दिली माहिती

टाळे ठोक आंदोलन करू

कोरोनामुळे शहरात नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशा वातावरणात काही खासगी रुग्णालये परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. गरीब रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन लुट करीत आहेत. अशा रुग्णालयांवर पालिकेने कारवाई न केल्या त्या रुग्णालयांविरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन करून टाळेठोकू असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी दिला.

 

illegal treatment on corona  patients navi mumbai municipal corporation suspends hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal treatment on corona patients navi mumbai municipal corporation suspends hospital