...म्हणून रॅपिड अॅंटीजन चाचणीसाठी 'त्यांना'ही परवानगी द्या; वाचा कोणी केली मागणी...

rapid antigen
rapid antigen

मुंबई : कोरोना विषाणूची बाधा झाली की नाही, याचे निदान करण्यासाठी कमी वेळेत आणि कमी खर्चात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रॅपिड अॅंटीजन चाचणीला परवानगी दिली आहे, सध्या या चाचण्या राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच पालिका रुग्णालयात सुरु आहे. जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी व्हावी, म्हणून खासगी प्रयोगशाळांना अर्ज करण्यासही सांगितले होते. पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अधिकृत असलेल्या असंख्य पॅथॉलॉजिस्टनी अर्ज केले. मात्र, या प्रयोगशाळांना चाचणी घेण्यास परवानगी नाकारली गेली. 

मात्र राज्यात मोठ्या संख्येने चाचण्या व्हाव्यात आणि चाचण्याचे जाळे राज्यभर विणले जावे म्हणून  राज्य सरकारने सुरू केलेल्या कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्टिंगसाठी खाजगी पॅथॉलॉजिस्ट प्रयोगशाळांना परवानगी द्यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. मात्र आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खाजगी लॅबला एनएबीएलची मान्यता असल्याखेरीज ही परवानगी देऊ नये." या कारणासाठी ही परवानगी नाकारली गेली.

राज्य सरकारने दक्षिण कोरियाच्या एस.डी. बायोसेन्सरने बनवलेल्या ‘स्टँडर्ड क्यू कोविड -19 एजी-डिटेक्शन किट’ द्वारा कोव्हिड- 19 ची रॅपिड अँटीजेन चाचणी सुरू करण्याचा उत्तम आणि गतीशील निर्णय घेतला. या चाचण्या आजवर वापरल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्या व्यतिरिक्त केल्या जाणार आहेत. आताच्या घडीला महाराष्ट्र राज्यात केवळ 48 एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत आणि त्या मुख्यत: मेट्रो शहरांमध्ये आहेत. त्याऐवजी, पॅथॉलॉजी/ मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पात्रता असलेले आणि 'महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे' अंतर्गत अधिकृत असलेले जवळपास 5 हजार खासगी पॅथॉलॉजिस्ट्स आणि मायक्रोबायोलॉजिस्ट कार्यरत आहेत. या प्रयोगशाळा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात, छोट्या-मोठ्या शहरांसह तालुक्याच्या ठिकाणीही उपलब्ध आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याने आयसीएमआर आणि महाराष्ट्र शासनास, प्रयोगशाळांना रॅपिड अँटीजेन तपासण्या करण्यासाठी असलेली एनएबीएल मान्यतेची ही अनावश्यक अट काढून टाकावी आणि सर्व पात्र आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असलेल्या पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्टना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. 

परवानगी मिळाल्यास महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवश्यकतेनुसार तातडीने कोरोना संसर्गाची शंका असल्यास त्वरित चाचणी घेणे सोपे होईल. आरटीपीसीआर चाचणीच्या तुलनेत अतिशय कमी शुल्कात आणि केवळ 30 मिनिटांत निकाल उपलब्ध होत असल्याने रोगनिदानाच्या प्रक्रियेला मोठीच चालना मिळेल. अगदी दुर्गम भागात देखील या चाचण्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरवता येईल. 5 हजार नव्या चाचणी केंद्रांची भर पडल्याने, कंटेनमेंट आणि हॉटस्पॉट क्षेत्रातील लोकांची तपासणी, रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींची चाचणी करणे सोपे होईल. 
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य

संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com