मोठी बातमीः बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला...

पूजा विचारे
Thursday, 9 July 2020

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आता त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट आला समोर आला आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे. डॉक्टर असो वा पोलिस किंवा राजकारणी लोकं यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधल्या तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या घरात कोरोनानं शिरकाव केला. पण सुदैवानं यातून त्या मंत्र्याची सुटका झाली आहे. 

महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनीही कोरोनाची चाचणी केली होती. आता त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट आला समोर आला आहे.  बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल रात्री उशिरा त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट आला.

टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगल्यावरील अन्य कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य वीस जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. थोरात हे सध्या मुंबईतच आहेत. दक्षता म्हणून त्यांनी स्वत:ला तेथेच क्वांरटाईन केलं आहे. 

अधिक वाचा- 'त्या' प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज अजित पवार-संभाजीराजे यांच्यात बैठक

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली. त्याआधी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सुरक्षारक्षकांनी कोरोनावर मात केली आणि त्यानंतर दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

हेही वाचा- धारावीत कोरोना हद्दपार, मग दादर अजूनही डेंजर झोनमध्ये का?

अमोल कोल्हे ही होम क्वांरटाईन

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन आहे.  स्वतः ट्विट करुन डॉ. कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली. 

State Revenue Minister Balasaheb Thorat corona test report negative home quarantine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Revenue Minister Balasaheb Thorat corona test report negative home quarantine