इजिप्तच्या इमानच्या प्रकृतीत सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बहिणीच्या आरोपांमुळे डॉक्‍टरने अंग काढून घेतले
मुंबई - 'इमानची बहीण शायमा हिने केलेले आरोप खोटे आहेत. इमानचे वजन घटल्यानेच तिचे मंगळवारी "सीटी स्कॅन' करण्यात आले.

बहिणीच्या आरोपांमुळे डॉक्‍टरने अंग काढून घेतले
मुंबई - 'इमानची बहीण शायमा हिने केलेले आरोप खोटे आहेत. इमानचे वजन घटल्यानेच तिचे मंगळवारी "सीटी स्कॅन' करण्यात आले.

बुधवारपर्यंत त्याचे अहवाल येतील,'' असे सैफी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुफेजा शाहिबी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी इमानवर उपचार करणाऱ्या पथकातील डॉ. अपर्णा भास्कर यांनी इमानच्या कुटुंबाला तिला इजिप्तला परत न्यायचे नसावे, असा आरोप केला.

'रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्र 204 किलो वजन पेलू शकते. त्यावर इमानचे "सीटी स्कॅन' करणे शक्‍य झाले, हाच तिचा वजन कमी झाल्याचा पुरावा आहे. इमानच्या प्रकृतीत चमत्कार वाटावाइतकी सुधारणा झाली आहे. कुटुंबाच्या अपेक्षा आणि वैद्यकीय माहिती नसल्यामुळे इमानच्या बहिणीने व्हिडिओद्वारे आरोप केले,'' असे त्या म्हणाल्या. 'बेरिऍट्रिक सर्जरी आणि अतिलठ्ठपणा कमी करण्यात रुग्णालयाची ख्याती आहे. त्यामुळेच उपचार करण्यासाठी इमानला येथे आणण्यात आले. डॉक्‍टरांना चांगले यश आले आहे. तिला अतिलठ्ठपणामुळे झालेले आजार आटोक्‍यात आणण्यात आले आहेत.

पायांतील दोषांमुळे तिला उभे राहता येणार नाही, हे खरे आहे,'' असेही हुफेजा यांनी सांगितले. इमानबरोबर असणारी तिची बहीण शायमा हिने 14 एप्रिलला व्हिडिओद्वारे सैफी रुग्णालयातील डॉक्‍टरांवर आरोप केले होते. त्याबाबत खुलासा करण्यासाठी रुग्णालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

रुग्णालयाच्या बेरिऍट्रिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा भास्कर म्हणाल्या, की इमानच्या बहिणीने असे आरोप करणे चुकीचे आहे. इमानला भारतात आणण्याच्या आधीपासून तिची काळजी घेणाऱ्या डॉक्‍टरांपैकी मी एक आहे. अनेक दिवस तिच्याबरोबर राहिले आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला घरी सोडण्याचा निर्णय डॉक्‍टरांच्या पथकाने घेतला आहे. प्रकृतीत झालेल्या सुधारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इमानच्या बहिणीला कदाचित तिला परत न्यायचे नसावे, त्यामुळेच ती असे आरोप करत आहे.

हा एक प्रकारे डॉक्‍टरांच्या कामावर झालेला हल्लाच आहे. याचा निषेध म्हणून इमानवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या पथकातून मी बाहेर पडत आहे. रुग्णाच्या नातेवाइकांचा डॉक्‍टर किंवा रुग्णालयावर विश्‍वास नसेल, तर त्यांनी दुसरा पर्याय निवडावा, असे डॉ. भास्कर म्हणाल्या.

Web Title: iman condition well