आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी कागदावरच!

सुनील पाटकर
शुक्रवार, 22 जून 2018

आपत्ती व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी कागदावरच सर्व विभागांचे चौविस तास आपत्ती नियंत्रण कक्ष दळणवळण सुविधा चांगल्या असाव्यात.
रस्ते, पूल व वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करावेत. वीज पुरवठा व दुरध्वनी सेवा खंडीत होउ नये.
- आरोग्य केंद्र, तेथील कर्मचारी व औषधे सुविधा
 

महाड - पावसाळा सुरु झाला कि आपत्ती व्यवस्थापनाला गती येते. जिल्ह्यापासुन तालुक्यापर्यंत आपत्ती निवारण आराखडे तयार केले जातात. आमदार, वरिष्ठ अधिकारी आपत्ती निवारण बैठकाही घेतात परंतु आपत्ती निवारण आराखडे केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.आपत्ती निवारण आराखड्यात प्रत्येक सरकारी विभागाने कोणती कार्यवाही करावी या संबंधीचा आढावाही घेतला जातो परंतु प्रत्यक्षात बहुसंख्य सरकारी विभाग याबाबत उदासिनच आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागाने आपत्तीपूर्व व आपत्तीनंतर काय कारावे याचा आराखडा तयार केलेला आहे. रस्ते, शाळा, आरोग्य, वीजपुरवठा, दूरध्वनी, वाहतूक व्यवस्था या बाबी आजच्या काळात महत्वाच्या झाल्या आहेत. आपत्ती  व्यवस्थापनातही याकडे विशेष लक्ष दिले जाते. सर्व विभागांचे चौविस तास आपत्ती नियंत्रण कक्ष असावेत परंतु महसुल, पालिका व पोलिस विभाग वगळता अन्य विभाग हा विषय गांभिर्यानं घेताना दिसत नाहीत. रस्ते व पूल सुस्थितीत असणे गरजेचे असतानाही महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचणी येत आहेत.पाली मार्गावरील आंबा नदीच्या पूलाला तर कठडे नाहीच तर महाड रायगड मार्गावर लाडवली पूलाचे कठडे तुटलेले आहेत. पाचाड घाटात संरक्षक भितंच धोकादायक झाली आहे.

रोह्यातील चांदोली रस्ता, महाड म्हाप्रळ रस्ता, पाली रस्ता असे ग्रामिण भागातील रस्ते खराब आहेत. विजेचे खांब धोकादायक असुन अलिबाग ते पोलादपूर पर्यंत पावसाळ्यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. दूरध्वनी सेवेचा तर बोजवाराच वाजला आहे, रायगडात बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत असल्याने आपत्ती काळात संपर्क कसा साधायचा हि समस्या निर्माण झालेली आहे. शाळांची दुरुस्ती रखडल्याने नादुरुस्त शाळात मुलांना बसावे लागत आहे, जिल्ह्यात उलटी जुलाब, कावीळ, अतिसार व लेप्टोच्या साथी येत असतात परंतु तालुक्यातील अनेक गावातील आरोग्य उपकेंद्र बंद रहात असल्याने ग्रामिण भागातील आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटवावीत असे असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यावर रेती खडीचे ढीग दिसत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: Important things of disaster management issue in mahad mumbai