esakal | मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना

बोलून बातमी शोधा

मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना
मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक (Adoption) वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये दिसून येत आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा 'सारा महाराष्ट्र'च्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329 0415 31 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे. अनाथ बालकांच्या (Orphans) असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही या विभागाने कळवले आहे. (Important Update regarding Parents who wants to adopt child)

हेही वाचा: "कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही..."

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबरच बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्त-स्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे. एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असून काही लोक या समस्येचा गैरफायदा घेत आहेत आणि परस्पर मुलांची विक्री करत आहेत.

हेही वाचा: कोरोना साहित्याच्या वाहतुकीबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

रचला जातोय 'भावनिक' सापळा

फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात आहेत. बालके दत्तकास उपलब्ध आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. हे लोक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे-देणे वा खरेदी-विक्री करणे, हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.

हेही वाचा: "भाजपने खुशाल आंदोलन करावं, सतरंज्या आम्ही घालून देतो..."

ज्या पालकांना बालक दत्तक घ्यायाचे आहे, अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे.