esakal | महाराष्ट्रात ६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर

बोलून बातमी शोधा

oxygen
महाराष्ट्रात ६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

राज्यात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत. २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. ३०० ते ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्याबाहेरून आणला जात आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रीक टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं बनलं आहे.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी उपचार तसेच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत, तसंच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे.

हेही वाचा: रूग्ण बरे होत आहेत, पण...; टास्क फोर्सने व्यक्त केली भीती

सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करता येईल, अशा सूचना मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये यासाठी तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होऊ नये याची पाहणी करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनाबाधितांच्या बेड्सबाबत BMC चा महत्त्वाचा निर्णय

राज्यात दररोज ७० हजार इंजेक्शनची गरज

रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिव्हीरमुळे कमी होत असल्याने ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप होतं आहे. त्यामुळे रेमडेसिव्हीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणं आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिव्हीर आयात करण्याचा प्रयत्न ही सुरू आहे.

मुंबईत ९९२० रुग्ण ऑक्सिजनवर

मुंबईतही ऑक्सिजन वरील रुग्णांचा आकडा वाढला असून गुरुवार पर्यंत ९९२० रुग्ण ऑक्सिजनवर होते. मुंबईत एकूण १०,७७३ ऑक्सिजन बेड असून त्यापैकी ८५३ रिक्त आहेत. तर २,८३४ आयसीयू बेड असून त्यापैकी २,७९२ भरले आहेत तर ४२ बेड रिक्त आहेत.