esakal | मुंबई: म्युकररमायकोसिसमुळे १४ रुग्णांनी गमावले डोळे
sakal

बोलून बातमी शोधा

 mucormycosis

मुंबई: म्युकरमायकोसिसमुळे १४ रुग्णांनी गमावले डोळे

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील केईएम,नायर आणि सायन या पालिका रुग्णालयांत म्युकरामायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांचे प्रमाण सध्या वाढले आहे. मागील कोरोना लाटेच्या तुलनेत वाढले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सुलभ होते असे मत मांडले आहे. मात्र, सध्या उशिरा निदानामुळे बऱ्याच रुग्णांसाठी हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अनेकांच्या चेहऱ्याच्या, नाकाच्या, टाळूच्या, मेंदूच्या आणि सर्वात महत्त्वाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहे. (In mumbai fourteen patients of mucormycosis lost there eyes)

कोविडपूर्वी ही म्युकरमायकोसिस या आजाराचे निरीक्षण होते पण, कोविडनंतर होणाऱ्या म्युकरचा वेग फार असून ही बुरशी वेगाने शरीरातील अवयवांभोवती विळखा घालते. ज्यामुळे, त्या व्यक्तीवर उपचाराचा भाग म्हणून बुरशीच्या संसर्ग झालेला तो अवयव किंवा तो भाग शरीरातून वेगळा करावा लागत असून म्युकरमायकोसिसला रोखणं तज्ज्ञ डॉक्टरांपुढे आव्हान झाले आहे.

याआधी अशा पद्धतीची बुरशी कधीही पाहिली नसल्याचे मत केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईत 611 रुग्ण, 78 मृत्यू -

सध्या मुंबईत 611 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 183 रुग्ण उपचार घेत आहेत. 428 हे बाहेरील रुग्ण आहेत.  तर, एकट्या केईएम रुग्णालयात एक चतुर्थांश रुग्ण दाखल असून ही संख्या 111 एवढी आहे. तर, याचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येत 28 टक्के आहे. तर, संपूर्ण मुंबईत आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 25 मृत्यू हे मुंबईतील आणि 53 मृत्यू हे मुंबईबाहेरुन उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे आहेत.

हेही वाचा: लस घेतल्यानंतर चुंबकत्व येतं का? तात्याराव लहाने म्हणतात...

केईएमधील रुग्णांची सद्यस्थिती -

111 रुग्णांपैकी साधारणपणे 40 टक्के रुग्णांना नाक, सायनस आणि टाळूवर परिणाम झाला आहे.

30 टक्के रुग्णांना सायनस आणि डोळ्यांमध्ये परिणाम झाला.

उर्वरित 30 टक्के रुग्णांना सायनस, डोळा, मेंदू आणि इतरही अवयवांवर परिणाम झाला. तर, त्यातील 6 रुग्ण हे किडनी प्रत्यारोपण झालेले आहेत. एक रक्ताचा कर्करोग झालेल्या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

91 रुग्णांच्या तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया -

केईएम रुग्णालयात आतापर्यंत 91 रुग्णांच्या तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जवळपास 31 रुग्णांच्या डोळ्यांमागे एप्फोटेरेसिन हे इंजेक्शन दिले गेले आहे.  61 रुग्णांवर कान-नाक-घसा या शस्त्रक्रिया झाल्या असून म्युकरचा भाग काढला आहे. 04 न्यूरोसर्जरी केल्या गेल्या आहेत. तर, 9 जणांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. 06 जणांच्या रक्तवाहिनीवर झालेला परिणाम पाहण्यासाठी अँजिओग्राफी केली आहे अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

2 वॉर्ड्स ही भरले -

खासगी रुग्णालयातील रुग्ण ही केईएम मध्ये दाखल होत असून दोन्ही वॉर्ड्स सध्या भरलेले आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ही रुग्णांची कोविड चाचणी केली जाते. तेव्हाही रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील अनेक रुग्ण हे भूल देण्यासाठीही फिट नसल्याकारणाने शस्त्रक्रियेसाठी अडथळे निर्माण होतात. 22 रुग्णांच्या टाळूला संसर्ग झाला असून तो भागही काढण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांनी खूप जास्त काळजी घेतली पाहिजे.

डॉ. हेतल मारफातिया, कान-नाक-घसा, विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय

हेही वाचा: लसीचा दुसरा डोस चुकवणाऱ्या ५० ते ६० हजार जणांना BMC शोधणार

सायनमध्ये 11 जणांचा डोळा काढला -

कोरोनापूर्वी वर्षाला केवळ आठ रुग्णांना या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत एकूण 65 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले गेले. त्यातील 42 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्यातील 11 रुग्णांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांच्यावर डोळ्यांची शस्त्रक्रिया केली गेली. तर, दोन रुग्णांचे दोन्ही डोळे काढावे लागले. तर, सद्यस्थितीत 20 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

डोळ्यांतील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा आजार जीवघेणा ठरतो. अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सायन रुग्णालयातील एकूण 65 बाधितांपैकी 11 रुग्णांचा एक डोळा काढण्यात आला. तर, दोन रुग्णांचे दोन्ही डोळे काढण्यात आले, त्यानंतर त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. परंतु, ही स्थिती फार कमी वेळा उद्भवते. त्यामुळे पोस्ट कोरोना काळात रुग्णांनी नाक वा तोंडात काहीही प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका ब्राडो यांनी दिली आहे.

कोविड रुग्णांना मधुमेह असेल तर या आजाराचा धोका अधिक आहे, त्यात कोरोनाच्या उपचार प्रक्रियेत स्टेरॉयडचा वापर केला जातो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊन काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका संभावतो. काही स्टेरॉयडमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते, त्याने हा संसर्ग अधिक वाढतो. या आजाराच्या सुरुवातीला नाकातून पाणी येणे, त्यातून थोडसं रक्त येणे, जबड्याच्या आत संवेदनाहिन होणे ही लक्षणे आढळतात. मात्र त्यावेळेस रुग्ण तपासणीस येत नाही. हा संसर्ग ज्यावेळेस डोळ्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस रुग्ण रुग्णालयात उपचारांकरिता येतात, तोवर उशीर झालेला असतो. डोळ्यानंतर हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचतो. या स्थितीत रुग्ण असल्यास शस्त्रक्रिया करुन बाधित त्वचा काढून टाकावी लागते, त्यानंतर 6 आठवडे इंजेक्शन द्यावे लागते. हे सर्व उपचार रुग्णालयात दाखल करुन करावे लागतात.

नायरमध्ये 48 रुग्णांवर उपचार सुरू -

नायरमध्ये आतापर्यंत 48 म्युकरमायकोसीसचे रुग्ण दाखल असून जवळपास 40 रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

कूपर रुग्णालयात तिघांनी  गमावले डोळे -

कूपर रुग्णालयातील तिघांना मोठ्या प्रमाणात झालेल्या संसर्गामुळे आपला एक डोळा गमवावा लागला. आतापर्यंत एकूण 24 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 5 जणांना शस्त्रक्रियेसह डिस्चार्ज देण्यात आला. तर, सध्या 16 जण दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर, 5 जणांना मेंदूपर्यंत संसर्ग झाला आहे. त्यामुळे, त्यांचे ही उपचार सुरू असल्याचे कुपर रुग्णालयाचे कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ.निनाद गायकवाड यांनी साांगितले.