बेलापूर रुग्णालयात बेबी इन्क्‍युबेटरचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ९० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून बेलापूर रुग्णालयात लहान मुलांसाठी बेबी इन्क्‍युबेटर बसवण्यात आले आहे. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.६) या इनक्‍युबेटरचे लोकार्पण करण्यात आले.

नवी मुंबई : अनेक दिवसांपासून लहान मुलांच्या आवश्‍यक यंत्रसामुग्रीअभावी बंद अवस्थेत असलेला महापालिकेचा बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभाग आता कार्यान्वित होणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ९० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून बेलापूर रुग्णालयात लहान मुलांसाठी बेबी इन्क्‍युबेटर बसवण्यात आले आहे. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.६) या इनक्‍युबेटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून म्हात्रेंचे आभार व्यक्त केले जात आहेत.     

बेलापूरच्या या माता-बाल रुग्णालयात यंत्रणा नसल्यामुळे हे रुग्णालय बंद अवस्थेत होते. त्यामुळे अनेक महिलांना व लहान शिशूंना घेऊन पालकांना खासगी व पालिकेच्या वाशीतील रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे यंत्रसामुग्री उपलब्ध होण्यासाठी यापूर्वीही सदर रुग्णालयास आमदार निधीतून १३ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका देण्यात आली होती. बेलापूर गावात अनेक गोरगरीब महिला राहत असून, महिलांना गर्भवतीच्या काळात अचानक नवजात बालक मुदतपूर्व जन्मास आल्यास त्याला बेबी इनक्‍युबेटरची आवश्‍यकता असते; परंतु खासगी रुग्णालयातील इनक्‍युबेटरचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. तसेच बेलापूर विभागातील नागरिकांना आपल्या नवजात बालकाला वाशी येथील रुग्णालयात घेऊन जावे लागते. आता या नवजात बालकांवर बेलापूर येथेच उपचार होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of baby incubator at Belapur Hospital