आवक वाढल्याने मिरचीच्या दरात घसरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

घाऊक बाजारात जून महिन्यात मिरचीचे दर ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले होते; तर मागील महिन्यात २० ते २५ रुपये किलोपर्यंत हे दर झाले होते. आता यामध्येदेखील घसरण झाली असून, हिरवी मिरची घाऊक बाजारात आता १५ ते २० रुपये किलोच्या घरात आली आहे.

नवी मुंबई : पावसामुळे बाजारात भाज्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत असली, तरी हिरव्या मिरचीची आवक मात्र वाढली आहे. त्यामुळे बाजारात सध्या चांगल्या प्रकारची हिरवी मिरची येत असून, तिचे दरही घसरले आहेत. घाऊक बाजारात जून महिन्यात मिरचीचे दर ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले होते; तर मागील महिन्यात २० ते २५ रुपये किलोपर्यंत हे दर झाले होते. आता यामध्येदेखील घसरण झाली असून, हिरवी मिरची घाऊक बाजारात आता १५ ते २० रुपये किलोच्या घरात आली आहे.

पुढील महिनाभर तरी हे दर वाढणार नसल्याचे व्यापारी इस्माईल शेख यांच्याकडून सांगण्यात आले. जून महिन्यात मिरची ६० रुपये किलोपर्यंत गेली होती. त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा सर्वांनाच झोंबायला लागला होता; मात्र आता हिरवी मिरची १५ ते २० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. बाजारात नाशिक, पुणे, कर्नाटक, गुजरातमधून हिरवी मिरची येत आहे.

सध्यस्थितीत ३५ ते ४० गाड्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. बाजारात मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परिणामी, मिरचीचे दर खाली आले आहेत.
- इस्माईल शेख, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the increase in arrivals Chilli prices fall