ग्रामीण भागात श्‍वानदंशाचा डंख 

किशोर कोकणे
शनिवार, 14 एप्रिल 2018

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्‍वानदंशांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 2017 मध्ये शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्‍यांमधील ग्रामीण भागात सात हजार 399 जणांना श्‍वानदंश झाला असून यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीची सरासरी काढली असता महिन्याला सुमारे 600 जणांना श्‍वानदंश होत असल्याचे दिसून येते. शहापूर आणि भिवंडी तालुक्‍यात सर्वाधिक श्‍वानदंशाचे प्रकार घडत आहेत. ग्रामीण भागात जागोजागी भटक्‍या श्‍वानांच्या संख्येत वाढ होत असून रात्रीच्या वेळेत या श्‍वानांचा उपद्रव सुरू असतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

ठाणे जिल्हा परिषदेची शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या पाच तालुक्‍यांमध्ये 33 आरोग्य केंद्रे आहेत. गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात श्‍वानांचे प्रमाण वाढत असतानाही त्यांचे निर्बीजीकरण करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाचे आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. 2017 या वर्षात 1 जानेवारी ते 31 डिसेंबरदरम्यान श्‍वानदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. शहापूर तालुक्‍यात तब्बल दोन हजार 470 जणांना; तर भिवंडीत दोन हजार 194 जणांना श्‍वानांनी चावा घेतला. मुरबाड येथे श्‍वानदंशाचे प्रमाण 585 इतके असले, तरीही येथे सप्टेंबर महिन्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. कल्याण तालुक्‍यात हे प्रमाण 758 इतके आहे; तर अंबरनाथ येथे एक हजार 392 जणांना श्‍वानदंश झाला आहे. 

आम्ही ठाणे जिल्ह्यात श्‍वानांच्या निर्बीजीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच श्‍वानाने चावा घेतल्यानंतर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णावर उपचार सुरू केले जातात. 
- बी. एस. सोनवणे, आरोग्य अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद 

श्‍वानदंशाची आकडेवारी ( 1 जानेवारी ते 31 डिसेंबर-2017) 
तालुका दंश 

शहापूर 2470 
मुरबाड 585 (तीन मृत्यू) 
भिवंडी 2194 
कल्याण 758 
अंबरनाथ 1392 
--------------------------------- 
एकूण- 7399 

Web Title: Increase in the incidence of dog breeds in rural areas