कोरोनासह मानसिक आजारांमध्ये वाढ; आर्थिक संकटामुळे अनेकजणांचा व्यसनांकडे वाढतोय कल

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 28 July 2020

एकूणच व्यवसायिक, नोकरदार तसेच हातावर पोट असणाऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली असून याचे विपरीत परिणाम होण्याची भीती नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले आहे. देशभरात गेल्या चार महिन्यांत अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी किंवा थांबवल्यामुळे नोकर कपात केली. काही कंपन्यांमध्ये कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करत असले तरी तेथेही वेतनात कपात झाली आहे. तसेच, अनेकांना गेल्या दोन, तीन महिन्यांपासून वेतन मिळत ऩसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे एकूणच व्यवसायिक, नोकरदार तसेच हातावर पोट असणाऱ्या कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली असून याचे विपरीत परिणाम होण्याची भीती नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

अमिताभ यांच्यासाठी एका अज्ञाताने लिहिलं कोविडने तुमचा मृत्यु झाला पाहिजे, मग बिग बींनी असं दिलं उत्तर

गेल्या दोन महिन्यांत अकारण भीती वाटणे, शांत स्वभावाच्या व्यक्तीत अचानक रागाची भावना निर्माण होणे, नोकरी गेल्यामुळे अथवा धंदा बंद झाल्यामुळे व्यसनाधीन होणे, अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत. त्यासोबतच कोरोनाग्रस्त नागरिकांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहे. भारतात मानसिक आजाराकडे फारच कमी लक्ष दिले जाते.  मात्र, सध्या मानसिक आजारांना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. त्यासाठी 'कोरोना आज है कल नही' ही संकल्पना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये राबवली जात आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती घालवण्याचेही काम केले जात आहे. यामध्ये कोरोना या आजाराबाबतची सर्व माहिती रुग्णाला दिली जाते.  त्यामुळे रुग्णाची भीती दूर होते. यासोबतच  मनः शांती टिकून राहण्यासाठी योगाचे ऑनलाईन प्रशिक्षण तसेच कुटुंबातील सुसंवाद कसा वाढवावा ? तसेच समस्येतुन संधी कशी निर्माण करावी, यावर मार्गदर्शन केले जात असल्याचे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे मनोविकार तज्ज्ञ डॉ ओंकार माटे यांनी सांगितले.

'मदर इंडिया' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

तणाव वाटत असेल तर काय कराल?
मानसिक ताणतणाव वाढून उदास वाटत असेल किंवा चिंता वाढली असेल, तर आपले मित्र-मैत्रिणी, शेजारी व नातेवाईकांशी बोला. घरातील वातावरण आनंदी ठेवा. त्यातूनही नैराश्य जात नसले तर, समुपदेशकाबरोबर बोलावे किंवा मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात वाचन, लिखाण, व्यायाम करणे, चित्र काढणे, संगीत ऐकणे, चांगले चित्रपट विशेषत: हास्यपट- बघणे आणि कुटुंबातील सदस्यांशी नियमित संवाद सुरु केले पाहिजे. अमरिकेसारख्या प्रगत देशात अजूनही फक्त 50 टक्के नागरिक मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी पुढे येतात. तुलनेत भारतामध्ये हे प्रमाण 8 ते 10 टक्के आहे. कोरोना संकटकाळात हे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

विकृतीचा कळस! भटक्या कुत्रीवर नराधमाकडून अनैसर्गिक अत्याचार

व्यस्नापासून लांबच राहा
कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबामध्ये मानसिक आजारांची त्सुनामी येण्याची चिंता संपूर्ण जगभर व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत नोकरी गेल्यामुळे अनेक तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती विविध आरोग्य संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या काळात सावध राहून व्यस्न करणे आवर्जून टाळायला हवे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

60 टक्के रुग्णांत अस्वस्थता
कोरोनाची लागण झालेल्या 60 टक्के व्यक्तींमध्ये मानसिक आजारांची लागण होऊ शकते, असा निष्कर्ष लेन्सेट अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनामुळे आता आर्थिक अस्थिरतेचा खूप मोठा धोका भारताला आहे आणि तो दीर्घ काळ टिकणारा आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या चिंतेच्या वातावरणात रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग, लठ्ठपणा तसेच, व्यसनाधीनता यांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मनोविकार तज्ज्ञ डॉ. ओंकार माटे यांनी दिली.

-------------------------------------------

संपादन  - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase in mental illness, including corona, has left many addicted, depressed due to the financial crisis