
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड संख्येत वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई महापालिकेतील वॉर्डच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या २२७ वरुन ही वॉर्ड्सची संख्या आता २३६ करण्यात आली आहे. म्हणजेच वॉर्ड्सच्या संख्येत ९ ने वाढ करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर या वॉर्डच्या रचनेवर काम सुरु होईल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई शहरातील लोकसंख्येत वाढ झाल्यानं सन 2001 नंतर लोकसंख्याच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढवण गरजेचे होते. त्यामुळे सध्याच्या 227 वॉर्डवरुन ही संख्या 236 करण्यात आली आहे. म्हणजेच हे वॉर्ड्स नऊने वाढवण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असून यानंतरच यावर काम सुरु होईल. तसेच महापालिका निवडणुकीआधी हे काम पूर्ण होईल. दरम्यान, कोणत्या विभागात किती वॉर्ड वाढवायचे याचे नियोजन महापालिका करणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच महापालिका तयार करणार आहे.
याप्रकरणी माहिती देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सन २००१ नंतर गेल्या वीस वर्षात मुंबईची लोकसंख्येत मोठी भर पडली आहे. मतदारवाढीचं प्रमाण आणि वाढत्या नागरिकरणामुळं नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करणं गरजेचं होतं. जेणेकरुन या प्रभागातल्या नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देणं आणि त्याचा समतोल राखणं हे आवश्यक होतं, म्हणून आज सदस्य संख्यावाढीचा निर्णय मंत्रमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला."