पालघरमध्ये मतदारांचा वाढता टक्का वादात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे या वेळी वाढलेल्या मतांवर देखरेख करण्याची घोषणा बविआने केल्याने मतदानाच्या दिवशी या तिन्ही मतदारसंघांत वाद होण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पालघर जिल्ह्यात ३ लाख सात हजार मतदारांची वाढ झाली होती. त्यापैकी एक लाख ५४ हजार मतदार हे पालघरच्या मे २०१८ मधील पोट निवडणुकीनंतर वर्षभराच्या कालावधीत वाढले होते. विशेषतः त्यापैकी ७२ हजार मतदार हे त्या निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या तीन महिन्यांत वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मतदारांची नोंदणी करणारी यंत्रणा सदोष असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला होता.

ऑनलाईन पद्धतीने नव्या मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच  असून लोकसभा निवडणुकीनंतर एप्रिल ते ऑगस्ट २०१९ या दरम्यान जिल्ह्यात ५० हजार ८३३ मतदार वाढल्याची नोंद झाली होती. या वेळी नालासोपाऱ्यात २४ हजार ७९७, बोईसरमध्ये १२ हजार ७२३, तर वसईमध्ये ७ हजार ६१७ मतदारांची वाढ झाल्याची नोंद आहे. १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मतदार नोंदणीचा सपाटा जलद गतीने सुरू राहिला असून या २६ दिवसांच्या कालावधीत सरासरी सहाशे मतदार प्रतिदिन या दराने तब्बल १५ हजार ५३८ मतदारांची संख्या वाढली आहे. 

मतदार वाढीचा हा दर भयावह असून यापेक्षा अधिक गतीने लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यापूर्वी वर्षभराच्या कालावधीत मतदार नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. या अतिजलद गतीने नोंदले जाणाऱ्या नालासोपारा, वसई आणि बोईसर या मतदार संख्येबाबतची माहिती पालघरच्या जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक विभागाकडे कळवली आहे. मतदारांची नोंदणी करताना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता होत असल्याची तसेच नव्या मतदारांच्या पुराव्याची पडताळणी संबंधित बी.एल.ओ आणि तालुका मतदान अधिकारी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.  
डॉ. कैलाश शिंदे, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पालघर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing percentage of voters Suspicion in Nalasopara, Vasai, Boisar