विशीच्या तरुणांना हृदयविकार

विशीच्या तरुणांना हृदयविकार

मुंबई - व्यायाम न करणे, सातत्याने समाजमाध्यमांवर राहणे आदी कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. २० वर्षांच्या वयात हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे आरोग्यासाठी निश्‍चितच गंभीर इशारा देणारी बाब आहे. त्यामागील महत्त्वाची कारणे शोधण्यासाठी सखोल संशोधनाची गरज असल्याचे मत हृदयविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

कुर्ल्यातील १४ वर्षीय आठवीतील मुलाला हृदयविकाराचा अचानक झटका आला. त्याचा जीव वाचवण्यात डॉक्‍टर यशस्वी झाले आहेत. मात्र इतक्‍या लहान वयात मुलाला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे डॉक्‍टर हादरून गेले आहेत. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्गातील शिक्षण घेणऱ्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या आई-वडिलांनी मुलाला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे की नाही याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे, असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दीपक शिंदे यांनी सांगितले. विशीच्या वयोगटात मुलांमध्ये विशेषतः हृदयविकाराचा झटका दिसून येत आहे. दर महिन्याला किमान दोन तरुण वयोगटातील रुग्ण हृदयविकाराचा झटका आल्यामुळे उपचारासाठी येतात. या वयात त्यांची ॲन्जिओप्लास्टी करावी लागते. घर व कार्यालयातील जबाबदारीत अडकल्याने ताण वाढत असावा, अशी शक्‍यता त्यांनी वर्तवली.

चुकीच्या जीवनशैलीचा फटका
इंडियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीनुसार, ३५ ते ५० वयोगटात दिसून येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्‍याचे प्रमाण हे ३५ टक्के आहे. दरम्यान, हृदयविकाराचे वाढते आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढत असल्याचा मुद्दा ज्युपिटर रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी उपस्थित केला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह यांच्या जाळ्यात रुग्ण अडकला की हृदयविकाराचा झटका येण्याची भीती जास्त असते, असे डॉ. सुरासे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com