Nitin Gadkari : हिंदुस्तानचे इंफ्रास्ट्रक्चर गरीबांच्या पैशातून उभे करणार; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari : हिंदुस्तानचे इंफ्रास्ट्रक्चर गरीबांच्या पैशातून उभे करणार; नितीन गडकरी

डोंबिवली - देशातील पायाभूत सोयी सुविधांच्या कामांसाठी मी अर्थसंकल्पावर अवलंबून रहात नाही. भांडवली बाजारातून यासाठी निधी उपलब्ध करतो. यासाठी आज अनेक परदेशी संस्था रांगा लावून उभ्या आहेत. परंतू यापुढे हिंदूस्थानचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी गरीब माणसाच्या पैशातून ते उभे करण्याचा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण येथे व्यक्त केला.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण मोहोत्सवी उदघाटन सोहळा शुक्रवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संचालक डॉ. सतीश मोढ, नवी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश साळवेश्वरकर, बँकेचे संस्थापक संचालक प्रा. अशोक प्रधान, सचिन आंबेकर, रत्नाकर फाटक, मोहन आगरकर, अतुल खिरवडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री गडकरी यांनी वरील मानस व्यक्त केला. आपल्याला दरवर्षी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची गरज भासते विदेशातून यासाठी अनेक संस्था अर्थसहाय्य करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु यापुढे त्यांच्याकडून हा पैसा न घेता देशातील रिटायर माणूस सफाई कामगार पिऊन कॉन्स्टेबल पत्रकार आदी नोकरदार वर्गाकडून पैसे उभे करण्याची आपली इच्छा आहे. या नोकरदार मंडळींना आठ टक्के रिटर्न देऊन त्यांच्या पैशातून देशामध्ये हायवे उभारणार असल्याचे गडकरी यावे म्हणाले. बॅंकांनीही यात गुंतवणूक करण्यास हरकत नाही असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित बँक कर्मचाऱ्यांना दिला.

आर्थिक सत्ता आपल्याला व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहीजे. तरुण प्रतिभावान अभियंते हे हिंदूस्थानात आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील राष्ट्र भारताकडे मोठ्या अपेक्षेने पहात असून त्यांना भारतासोबत व्यवहार करायचा आहे. यासाठी परिपूर्णता देखील महत्त्वाची असून ती अनुभव आणि सरावातून निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आधुनिकीकरण आणि पाश्चीमात्यकरण हे दोन्ही वेगवेगळे शब्द असून पाश्चिमात्यकरणाचे आपण बिलकुल समर्थन करत नाही. मात्र आधुनिकीकरणाबाबत आवश्यक असणारे सर्व ते परिवर्तन आपण वेळोवेळी केले पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणा आणि कौशल्य यांचा संगम साधला पाहीजे असेही नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले. भविष्याचा विचार करता पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी बँकेने अशा गाड्यांच्या कर्जावरील व्याजदरात कपात केल्यास लोक त्याकडे मोठ्या प्रमाणात वळतील अशी अपेक्षा वजा विनंती गडकरी यांनी यावेळी केली.

कागदपत्रांची खरचं गरज आहे का ?

एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज घेण्यासाठी बॅंकांकडून विविध कागदपत्र सादर करण्याचा तगादा लावण्यात येतो. जो माणूस प्रामाणिक आहे, पाच वर्षाता त्याचा रेकॉर्ड चांगला आहे त्याला चोवीस तासात योग्य रेटिंग दिले गेले पाहीजे. त्याला उगाच नाचवता कामा नये, हो तर हो किंवा नाही तर नाही त्वरीत सांगण्यात यावे. खरेच एवढी कागदपत्रांची गरज असते का असे गडकरी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. हे पाहून गडकरी म्हणाले, नागरिकांची प्रतिक्रीया पहा म्हणजे माझी टोपी योग्य पडली असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कागदपत्रांचा तगादा थांबवा. वेळेत निधी उपलब्ध झाला नाही तर व्यावसायिकांची खूप मोठी अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या कामाचं कौतुक करताना गडकरी म्हणाले की विश्वसनीयता ही बाजारात विकत मिळत नाही. विश्वासनीयता हे एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे भांडवल असून त्याला शॉर्टकट नाहीये. कल्याण जनता सहकारी बँकेच्या संस्थापक संचालक माजी संचालक आणि विद्यमान संचालकांनी गेल्या पन्नास वर्षांच्या काळात लोकांच्या मनात ही विश्वसनीयता निर्माण केली आहे ज्यामुळेच आज बँक या यशोशिखरावर विराजमान झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

सहकारी बॅंकांची आता जागतिक बॅंकांशी स्पर्धा

जागतिक अर्थव्यवस्थेत तुमची स्पर्धा ही जागतिक बॅंकांसोबत होणार आहे. इंटरनेटच्या जाळ्यामुळे नागरिक आता जागतिक बॅंकांकडून कर्ज काढू लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात आर्थिक क्षेत्रात यशस्वी होत असताना आपण सामाजिक दायित्व सांभाळून या संघर्षातून सहकारी बॅंकांचा आलेख उंचावणे हे आपल्या समोर आव्हान असेल. सहकारी बॅंकांची सक्सेस स्टोरी ही केवळ महाराष्ट्र, गुजरात पुरतीच सिमीत राहीली आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे गरजेचे असल्याचे मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमात बँकेच्या नविन लोगोचे, नव्या मोबाईल बँकिग ॲपचे, नविन डेबिट कार्डाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तर उद्योजक मधू हब्बु आणि अमित घैसास यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते समाज सेवा पुरस्कार देऊन यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.