esakal | "भारताला आता महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची गरज"

बोलून बातमी शोधा

sanjay raut
"भारताला आता महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची गरज"
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात सध्या कोरोनाचा हाहा:कार माजलाय. रोज मोठ्या संख्येने रूग्ण कोरोनाबाधित होत आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबई गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच स्थिती पाहायला मिळत होती. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची योग्य ती माहिती घेतली आणि त्यानुसार राज्यात चांगल्या पद्धतीचं मॉडेल राबवलं. मुंबईनेदेखील रूग्णसंख्या वाढ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं टाकली आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येतोय. आतापर्यंत मोदी सरकारने देशात विविध राज्यांची मॉडेल्स राबवली, पण मला वाटतं असं वाटतं की आता भारताने महाराष्ट्र मॉडेल राबवावं आणि कोरोनाला आळा घालावा, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

"पहिल्या लाटेचा भारताने धैर्याने सामना केला. दुसऱ्या लाटेच्याबद्दलचे काही अंदाज चुकले. पण त्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याबाबत मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा अगदी जिल्हाधिकारी कार्यालये असोत... आपण या सगळ्यांकडे सकारात्मक नजरेने पाहायला हवं. सध्या यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी होतेय हे मला मान्य आहे. आपल्या सर्वांना मिळून हे संकट घालवावं लागेल", अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: Phone Tapping Case: 'शक्य नाही..!!' रश्मी शुक्लांचे मुंबई पोलिसांना उत्तर

"महाराष्ट्रात आणि मुंबईत रूग्णसंख्या वाढ कमी झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २४ तास काम करत आहेत. राज्यातील प्रत्येक गावात आणि घरात कुठे काय चाललंय, या सगळ्यावर त्यांचं लक्ष आहे. ते सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणात येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. अशा परिस्थितीत देशातील परिस्थिती गंभीर असताना देशाने महाराष्ट्र मॉडेल किंवा मुंबई पॅटर्न राबवण्याची गरज आहे", असं रोखठोक मत त्यांनी मांडलं.