भारतीय "इका' जाणार चंद्रावर

- किरण कारंडे
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई -  चंद्राचा अभ्यास करण्यासाठी प्रथमच जगातील पाच खासगी टीम संशोधन करणार आहेत. त्यात भारतातील टीम इंडस्‌ या स्टार्टअप कंपनीचाही समावेश आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या अखेरीस "इका' हे अंतराळ यान चंद्रावर पाठवणार आहे. ते 27 जानेवारी 2018ला चंद्रावर उतरेल आणि अभ्यास सुरू करेल.

मुंबई -  चंद्राचा अभ्यास करण्यासाठी प्रथमच जगातील पाच खासगी टीम संशोधन करणार आहेत. त्यात भारतातील टीम इंडस्‌ या स्टार्टअप कंपनीचाही समावेश आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या अखेरीस "इका' हे अंतराळ यान चंद्रावर पाठवणार आहे. ते 27 जानेवारी 2018ला चंद्रावर उतरेल आणि अभ्यास सुरू करेल.

जगातील आतापर्यंतच्या सर्व अंतराळ मोहिमा त्या त्या देशातील सरकारच्या होत्या; परंतु हा पायंडा मोडत भारतातून पहिल्यांदाच टीम इंडस्‌ ही खासगी कंपनी चंद्रावर यान पाठवणार आहे. त्याचे नाव एक छोटीशी आशा (इका) असे आहे. चंद्रावर हाय डेफिनेशन छायाचित्रे घेण्याबरोबरच "इका' तेथील रेडिएशनच्या पातळीचा अभ्यास करेल. तसेच प्रकाशाशी संबंधित प्रयोगही करेल. चंद्रावर रात्री उणे 200 अंश सेल्सिअस एवढे तापमान असते. त्यामुळे उणे 130 ते 200 अंश सेल्सियस तापमानातही तग धरू शकेल असी "इका'ची रचना आहे, अशी माहिती टीम इंडस्‌चे सहसंस्थापक दिलीप छाब्रिया यांनी सांगितले. गुगल, टाटा आणि इस्रो या संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. डिसेंबर अखेरीस ही मोहीम सुरू होईल, असेही छाब्रिया यांनी सांगितले. या मोहिमेत यान आणि पृथ्वीवरील बेस स्टेशन यांच्यातील संपर्कासाठी टाटा कम्युनिकेशन मदत करणार आहे.

चंद्रावर 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस अंधार असतो. त्यामुळे "इका' सूर्यप्रकाश असताना चंद्रावर उतरेल आणि आपला अभ्यास सुरू करेल. तेथील रात्रीच्या तापमानात कमालीचे बदल होतात. ते सहन करण्याची "इका'ची क्षमता नसल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश असताना 13 दिवसांत हा अभ्यास करण्यात येईल, असे छाब्रिया यांनी सांगितले. संपूर्ण मोहिमेसाठी 75 मिलिअन डॉलर्स (अंदाजे सव्वापाचशे कोटी रुपये) इतका खर्च येणार आहे.

यापूर्वी रशिया, चीन, अमेरिकेने चंद्रावर यान पाठवले आहे; पण आतापर्यंत कोणत्याही खासगी कंपन्यांनी चांद्र मोहीम आखली नव्हती; परंतु गुगल लुनार एक्‍सप्राईज या स्पर्धेतून ही संधी खासगी कंपन्यांना मिळाली आहे. सहा वर्षांपासून या प्रकल्पासाठी 120 जणांची टीम इंडस्‌ काम करत आहे.

पाच टीमची निवड
गुगल लुनार एक्‍सप्राईज या स्पर्धेत पाच देशांच्या टीम चांद्र मोहिमेसाठी निवडण्यात आल्या. त्यात भारतातील इंडस्‌ टीम एक आहे. अंतराळ मोहिमेत रोबोटिक्‍स तंत्रज्ञानातून संशोधनाला चालना देण्यासाठी अभियंते आणि आंत्रप्रिनर्सनी कमी खर्चातील संशोधन पद्धती विकसित करावी, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.

Web Title: indian ika go to moon