बल्गेरियन ठकसेनाकडे सापडले भारतीय पॅन कार्ड

अनिश पाटील
बुधवार, 19 एप्रिल 2017

आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली
मुंबई - स्किमरच्या साह्याने बनावट डेबिट कार्ड बनवणाऱ्या बल्गेरियातील नागरिकाने स्वतःचे बनावट भारतीय पॅन कार्डही बनवले आहे. या आरोपीच्या अंधेरीतील घरात सायबर पोलिसांना आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली असल्याचे समजते.

आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली
मुंबई - स्किमरच्या साह्याने बनावट डेबिट कार्ड बनवणाऱ्या बल्गेरियातील नागरिकाने स्वतःचे बनावट भारतीय पॅन कार्डही बनवले आहे. या आरोपीच्या अंधेरीतील घरात सायबर पोलिसांना आणखी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली असल्याचे समजते.

टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या मिल्चो गोशेव एन्जेलोव्ह (वय 45) याला नुकतीच सायबर पोलिसांनी अंधेरीत अटक केली. याच घरात पोलिसांना एन्जेलोव्हच्या नावाचे भारतीय पॅन कार्ड सापडले आहे. या पॅन कार्डवरील पत्ता ऍण्टॉप हिलचा आहे. चौकशी केल्यावर हा पत्ता बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या एन्जेलोव्हने भारतीय पॅन कार्ड कसे बनवले, यात काही भारतीयांचा हात असण्याचीही शक्‍यता आहे, याविषयी तपास सुरू आहे. आरोपीच्या घरी 235 बनावट डेबिट कार्ड सापडली. यापूर्वी त्याच्याकडून आठ बनावट डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने मोठ्या प्रमाणात बॅंकांच्या डेबिट कार्डचा डेटा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. 2014 मध्येही तो अशाच पद्धतीने भारतात आला होता. त्या वेळीही त्याने अशाच पद्धतीने अनेकांच्या खात्यातून रक्कम काढल्याचा संशय आहे.

चार बॅंकांच्या एटीएममधून काढले पैसे
जुहूतील एटीएममध्ये बनावट डेबिट कार्ड अडकल्यामुळे या बल्गेरियातील नागरिकाचे बिंग फुटले व त्याला अटक झाली. त्याने जुहूतील एटीएमसह मुंबईतील एकूण चार बॅंकांच्या एटीएममधून बनावट डेबिट कार्डच्या साह्याने पैसे काढल्याचे चौकशीत सांगितले. याबाबत संबंधित बॅंकांशी सायबर पोलिसांनी संपर्क साधला असून, लवकरच त्याबाबतची माहिती मिळेल.

Web Title: indian pan card to balgerian