भारताची ऐश्‍वर्या श्रीधर "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' 

भारताची ऐश्‍वर्या श्रीधर "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' 

मुंबई ः भारतीय छायाचित्रकार ऐश्‍वर्या श्रीधर हिने 56 व्या "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. लंडनच्या "नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम'ने पुरस्काराची घोषणा केली. 

रात्रीच्या वेळी झाडावर उडणाऱ्या रात्रकिड्यांच्या छायाचित्रासाठी ऐश्‍वर्याला "फोटोग्राफर ऑफ द ईयर'पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारासाठी जगभरातील 80 देशांमधून जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त छायाचित्रे पाठवण्यात आली होती. त्यामधून केवळ 100 छायाचित्रांना सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत पुरस्कार मिळवणारी ऐश्‍वर्या भारतातील सर्वांत कमी वयाची आणि पहिली महिला छायाचित्रकार ठरली आहे. 
ऐश्‍वर्याने यापूर्वी नवी मुंबईच्या उरण भागातील प्राणिसंपदा आणि खारफुटीच्या समस्या छायाचित्रांच्या आणि माहितीपटांच्या माध्यमातून जगापुढे आणल्या होत्या. "लाईट ऑफ पॅशन' शीर्षकाखाली "बिहेवियर-इन्व्हर्टेब्रेट्‌स' प्रकारात तिला पुरस्कार मिळाला आहे. हे छायाचित्र टिपण्यासाठी ऐश्‍वर्याने कॅनॉन कंपनीचा कॅमेरा वापरला होता. 

नवी मुंबईतील पनवेल शहरात राहणाऱ्या ऐश्‍वर्याला लहानपणापासून वन्यजीव छायाचित्रणाची आवड आहे. पिल्लई कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून तिने मास मीडियाचे शिक्षण घेतले. वन्यजीव वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसोबत ऐश्‍वर्या लेखक, फिल्ममेकर आणि पर्यावरणप्रेमी आहे. 10 वर्षांपूर्वी तिने फोटोग्राफी जगताच्या प्रवासाला सुरुवात केली. 

अनेक पुरस्कार जिंकले 
2019 मध्ये उरणमधील दुर्लक्षित तसेच नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पाणथळ जागांचे प्रश्‍न आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ऐश्‍वर्या श्रीधरने मांडले. त्यातील अनेक छायाचित्रणाने तिला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. "पणजे द लास्ट वेटलॅंड' हा ऐश्‍वर्याचा पहिलावहिला माहितीपट होता. "क्विन ऑफ तारू' नावाच्या तिच्या माहितीपटाला न्यूयॉर्कच्या नवव्या वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन फिल्म फेस्टिवलमध्ये "वुमन आयकॉन' पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये लंडनच्या रॉयल हाऊसने तिला "डायना' पुरस्काराने सन्मानित केले. ऐश्‍वर्याची अनेक छायाचित्रे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय मासिकांतही नेहमीच प्रकाशित होत आली आहेत. ऐश्‍वर्या उदयोन्मुख छायाचित्रकारांना चालना देण्यासाठी ई-वेबिनारच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देत असते. 

भारतासाठी आणि माझ्यासारख्या तरुण वन्यजीव छायाचित्रकारासाठी हा मोठा क्षण आहे. वरिष्ठांच्या कॅटेगरीत भारताकडून पुरस्कार जिंकणारी पहिली आणि सर्वांत कमी वयाची मुलगी ठरल्याने हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. 
- ऐश्‍वर्या श्रीधर

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com