भारत हुकूमशाहीच्या वाटेवर - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - ""निवडणुकीतील "जुमल्यां'नंतर आता भाजप सत्तेचे इमले बांधत आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पातील थापा या आचारसंहितेचा भंग नाही का,'' असा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

मुंबई - ""निवडणुकीतील "जुमल्यां'नंतर आता भाजप सत्तेचे इमले बांधत आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पातील थापा या आचारसंहितेचा भंग नाही का,'' असा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजपवरच तोफ डागली. अर्थसंकल्प मार्चमध्येच जाहीर व्हायला हवा. त्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपले अधिकार वापरले पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शिवसेनेचे खासदार राष्ट्रपतींना भेटून ही मागणी करतील, असेही त्यांनी जाहीर केले. निवडणूक लढवायची असेल, तर स्वच्छ मनाने लढवा. आमच्याकडे तेवढी लक्ष्मी नाही. जी आहे ती मते विकत घेण्यासाठी नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. बीजिंगमध्ये चुकूनही सरकारविरोधात बोलणारा माणूस दोन दिवसांनी गायब होतो. भारत आज त्याच वाटेने जात आहे. हा देश लोकशाही मानणारा आहे. येथे कम्युनिझम लादू देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींना फटकारले. 

पेटून उठू! 
धर्माच्या आधारावर मते मागता येणार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावरही ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, की हिंदू धर्माचे रक्षण करणे गुन्हा असेल, तर तो आम्ही करणारच. हिंदुत्वाचा गळा दाबाल, तर पेटून उठू, असा इशाराही त्यांनी दिला. 

ठाकरे उवाच 
* सरकार आता महिलांच्या बचतीवर लक्ष ठेवणार आहे. हे लोक घरात घुसणार. लपवून ठेवलेले पैसे शोधायला लागले, की त्यांना मसाल्याच्या डब्यात ढकला. 
* मंदिर वही बनायेंगे, धाड पण वही डालेंगे...तुमच्यात दम असेल, तर मशीद आणि चर्चमध्ये छापे मारून दाखवा. 
* नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा कशा बाहेर आल्या? खासगी बॅंकांनी गैरव्यवहार केले; पण जिल्हा बॅंकांवरील बंदी उठवलेली नाही. 
* विजय मल्ल्या पळाला तेव्हा झोपला होतात का? त्र्यंबकेश्‍वरच्या पुरोहितांनी दारू विकून पैसा कमावलेला नाही. 

Web Title: India's authoritarian way - Uddhav Thackeray