नवी मुंबईचा औद्योगिक कणा पार्किंगविनाच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नवी मुंबई शहराच्या निर्मितीच्या वेळी औद्योगिक कंपन्यांना अग्रक्रम देण्यात आला. मात्र, असे असले तरी दिघा, रबाले, महापे, तुर्भे, नेरूळ या महत्त्वपूर्ण औद्योगिक पट्ट्यात आजही मूलभूत सुविधेबरोबरच पार्किंगची समस्या भेडसावत आहे. 

नवी मुंबई ः मुंबई, ठाण्यालगत पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली. या निर्मितीच्या वेळी औद्योगिक कंपन्यांना अग्रक्रम देण्यात आला. मात्र, असे असले तरी दिघा, रबाले, महापे, तुर्भे, नेरूळ या महत्त्वपूर्ण औद्योगिक पट्ट्यात आजही मूलभूत सुविधेबरोबरच पार्किंगची समस्या भेडसावत आहे. 

दिघा रामनगरपासून ते नेरूळ एलपी असा डोंगरच्या कुशीत वसलेला २० किलोमीटरचा औद्योगिक पट्टा १९६० च्या दशकात झपाट्याने विकसित झाला. या पट्ट्याची निर्मिती होताना कंपनी नियमाप्रमाणे अंतर्गत परिसरातच मूलभूत सुविधा व वाहन पार्किंगचे नियोजन सूचित करण्यात आले होते. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने केवळ कर्मचाऱ्यांसाठी येणारी वाहने कंपनी आवारातच उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना आणि सामान घेऊन आलेल्या अवजड वाहनांना रस्त्यावरच प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच कंपनीतील प्रवाशांना ने-आण करण्याकरिता असणाऱ्या बसही रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केल्या जातात. त्यामुळे जवळपास ११०० कंपनीचा सहभाग असणाऱ्या या औद्योगिक पट्ट्याच्या किनारी लोकवस्तीने अतिक्रमण केल्याने त्यांचे नियोजन कोलमडले आहे.

पार्किंगच्या अनुषंगाने औद्योगिक परिक्षेत्रात त्या वेळी रबाले येथे आर एक्‍स हा ११ हजार ५२४ स्क्वेअर मीटर, तुर्भे येथे ३८ हजार ५७८ स्क्वेअर मीटर, दिघा येथील ग्रीन वर्ल्ड इमारतीच्या मागे १२ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड आरक्षित ठेवण्यात आला होता. नियोजनाअभावी या भूखंडावर पार्किंगची वाहने उभी राहण्याऐवजी डेब्रिजचे ढीग उभे राहिले आहेत. त्यामुळे एमआयडीसी परिसर हा पार्किंग तळाऐवजी गैरप्रकारांना खतपाणी घालणारा परिसर म्हणून ओळखला जात आहे. 

एकात्मिक विकास प्रकल्पात पार्किंग दुर्लक्षित
१९६० च्या दशकात औद्योगिक पट्टा निर्माण झाल्यांनतर तब्बल ५० वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत ११०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांचे दीर्घकालीन पुनर्निर्माण करण्यात आले आहे. मात्र, असे करताना पार्किंगसाठी पर्यायी जागाही सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्या रस्त्यावर आतापासूनच मनमानी पार्किंग सुरू आहे.

मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण
एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर कुंपण न घातल्याने भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. पार्किंगसाठी असणारे भूखंड भूमाफियांनी गिळकृत केल्याने आणि त्यांना वेळीच आवर न घातल्याने अतिक्रमणामुळे पार्किंगचे प्लॉट गिळंकृत केले गेले आहेत.

मिलेनियम बिझनेस पार्क येथे प्लॉट क्र. जनरल २७ हा ८,३०० चौ.मी.चा भूखंड पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावर ७०० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. या वाहनतळाबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असून, पालिकेकडे हा भूखंड हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- एस. पी. आव्हाड, उप अंभियता, एमआयडीसी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The industrial backbone of Navi Mumbai without parking