वनविभागाच्या चौकीत पोलिसांची घुसखोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

वज्रेश्वरी - भिवंडी महामार्गावर असलेल्या वनविभागाच्या जंगल उत्पन्न तपासणी चौकीत काही वर्षांपासून गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या काही पोलिस कर्मचाऱ्यांनी कामाच्या नावाखाली बस्तान मांडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वज्रेश्वरी - भिवंडी महामार्गावर असलेल्या वनविभागाच्या जंगल उत्पन्न तपासणी चौकीत काही वर्षांपासून गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या काही पोलिस कर्मचाऱ्यांनी कामाच्या नावाखाली बस्तान मांडून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

भिवंडी-वाडा महामार्गावरील अंबाडी नाक्‍यावरील चौफुलीवर वनविभाग, ठाणे यांच्या जागेवर १९८२ पासून लाकूड वाहतूक; तसेच जंगलातील खनिजांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी चेक पोस्ट नाका उभारण्यात आला आहे. या चौकीत रात्रं-दिवस एका वनसंरक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र येथे गणेशपुरी पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी व अधिकारी रात्रीची गस्त व ड्युटीच्या नावाखाली ठाण मांडून बसलेले असतात. या चौकीत पोलिसांची पेटी व दफ्तरसह कपाट आणून ठेवल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. एखादवेळेस वरिष्ठ अधिकारी वर्ग भेट देण्यास आल्यावर त्यांची मोठी अडचण होते. गणेशपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी येथे तळ ठोकून असल्याने, या चौकीला पोलिस चौकीचे स्वरूप आले आहे. परिणामी, वनविभागाच्या या चौकीला आता नागरिक पोलिस चौकी म्हणू लागले आहेत.

याबाबत गणेशपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदन जाधव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

अंबाडी नाक्‍यावरील चौकी वन विभागची आहे. या चौकीतले कर्मचारी वन उपज; तसेच डेपोवर लाकूड नेणाऱ्या वाहनांची तपासणी करतात. वनकर्मचाऱ्यांच्या सोईसाठी ही चौकी आहे. याबाबत पोलिस विभाग व वनसंरक्षक यांची चौकशी करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल.
- किशोर ठाकरे, उपविभाग वन अधिकारी; ठाणे.

Web Title: Infiltration of the police station of Forest Department