
सिडकोने कासाडी नदी संवर्धनासाठी पहिले पाऊल टाकत तिच्या पात्रातील जलचरांसह जैवविविधतेची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. या उपक्रमामुळे कासाडी नदी नसून नाला आहे, असा दावा करण्यात येत आहे. त्यालाही मोठी चपराक बसणार आहे.
पनवेल : एकेकाळी पनवेल तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली कासाडी नदी तळोजा परिसरातील औद्योगिकीकरणामुळे प्रदूषित झाली आहे. या विरोधात सामाजिक संस्थांसह "सकाळ'ने सातत्याने आवाज उठवला आहे. त्याची दखल घेत सिडकोने नदी संवर्धनासाठी पहिले पाऊल टाकत तिच्या पात्रातील जलचरांसह जैवविविधतेची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. या उपक्रमामुळे कासाडी नदी नसून नाला आहे, असा दावा करण्यात येत आहे. त्यालाही मोठी चपराक बसणार आहे.
हे वाचा : कांदळवनांनी अडवली मुंबईच्या विकसाची वाट
पनवेल तालुक्याच्या पश्चिमेकडील नवरा-नवरीच्या डोंगरातून वाहणारी नदी परिसरातील हजारो रहिवाशांच्या आस्थेचा विषय आहे. या नदीच्या पाण्यावर एकेकाळी मोठ्या प्रमाणात भाजीचे मळे फुलत होते. या जीवनवाहिनीला आध्यात्मिकदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे; परंतु तळोजा परिसरात औद्योगिकरण सुरू झाले. त्यानंतर काही कारखान्यांनी प्रदूषित सांडपाणी थेट नदीत सोडण्यास सुरुवात केली. या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली. माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्याने याचा परिणाम होऊन नदीतील मासेमारी पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर काही कारखानदारांनी सरकारदरबारी कासाडी ही नदी नसून पावसाळी नाला आहे, हे सिद्ध करून सरकारी दस्तऐवजातून कासाडी नदीचे अस्तित्वच नष्ट केले, असा आरोप होत आहे.
आनंदाची बातमी : धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने
काही सामाजिक संघटनांनी या बिकट परिस्थितीत कासाडी नदीला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आणि नदीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढा दिला. रोडपाली येथील "सेव्ह कासाडी' ही मोहीम राबवणारे स्थानिक मच्छीमार योगेश पगडे आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा मुद्दा हरित लवादात दाखल करणारे अरविंद म्हात्रे यांनीही प्रयत्न केले. "सकाळ' तर प्रदूषणासह कासाडी नदी गायब करण्याचा प्रयत्न "झिरो ग्राऊंड रिपोर्ट'द्वारे यावर प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेत सिडकोने नदी काठावर जैवविविधता दर्शवणारे फलक लावण्यात आल्याने बळ मिळाले आहे.
संकेतस्थळावर कासाडी आवश्यक
कासाडी ही नदी नसून नाला आहे, असा कारखानदार युक्तिवाद करतात. जिल्हा परिषद आणि पनवेल तहसीलच्या संकेतस्थळ कासाडी नदीचा उल्लेख नाही. त्यामुळे असा युक्तिवाद करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. कासाडी नदीचे अस्तित्व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी नदीचे अस्तित्व नष्ट करण्याच्या हालचाली सुरू असताना जिल्ह्याच्या नकाशामध्येही कासाडी नदीचा समावेश नाही. त्यामुळे पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सिडकोने आता फलकांवर कासाडीचा नदी म्हणून केलेल्या उल्लेखानंतर सरकारी दस्ताऐवजात तिचा नदी म्हणून उल्लेख आवश्यक आहे, असे मतही त्यांचे आहे.
(संपादन : नीलेश पाटील)