आयएनएस विराटचे होणार वस्तूसंग्रहालय 

आयएनएस विराटचे होणार वस्तूसंग्रहालय 

मुंबई : गौरवशाली इतिहास असणारी आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार 852 कोटी खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वातून राबविण्यात येणार आहे. 

आयएनएस विराट युद्धनौका मार्च 2017 मध्ये भारतीय नौसेनेतून निवृत्त झाली. सध्या ती नौसेनेच्या गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे. भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा तसेच तरुणांमध्ये सागरी क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, या हेतूने विराटचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. 

राज्य सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्‍स येथे किनाऱ्यापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात कॉंक्रीटची पायाभरणी करून स्थापित करण्यात येईल. तसेच या ठिकाणी असलेले वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्‍व पर्यटकांना पाहता येणार आहे. सागरी प्रशिक्षणाची सुविधा जहाजावर उपलब्ध होणार असून या ठिकाणी व्यापारी जहाजावरचे प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे. या नौकेवरील वस्तूसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृक्‌श्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास प्रदर्शित करणारे आभासी दालनांची सुविधा असतील. या सर्व प्रकल्पासाठी प्राथमिक अहवालानुसार 852 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर तो राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा तपशील निश्‍चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यासही आज मान्यता देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com