Inside story : अयोध्येत मिशीसहित श्रीरामांच्या मूर्तीची का होतेय मागणी?

सुमित बागुल
Tuesday, 4 August 2020

जगात कुठेच श्रीरामांच्या मूर्तीवर मिशा नाहीत असंही नाहीये. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये प्रभू श्रीरामांचं असं एक मंदिर आहे जिथं श्रीरामांना मिशी आहे.

मुंबई - संभाजी भिडे यांनी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरात मिशीवाल्या श्रीरामांची मूर्ती असावी अशी मागणी केलीये. त्यांनी म्हटलंय की मूर्तीवर मिशा नसणे ही मूर्तिकारांनी केलेली ऐतिहासिक चूक आहे. ही चूक सुधारली गेली नाही तर त्यांच्यासारख्या भक्तांसाठी अयोध्येतील राम मंदिराचं काहीही महत्व उरणार नाही. म्हणूनच आता ही चूक सुधारून अयोध्येतील राम मंदिरात मिशीवाल्या श्रीरामांची मूर्ती स्थापन केली गेली पाहिजे  

संभाजी भिडे यांनी श्रीरामांच्या मूर्तीत मिशांची कल्पना तर केलीये, मात्र हिंदू धर्मात ब्रह्मदेवाला सोडून कोणत्याही देवाच्या तसबिरीत किंवा मूर्तीत मिशा दिसत नाहीत. अगदी काही ठिकाणी शंकर देवांच्या फोटोत किंवा मूर्तीमध्ये मिशा पाहायला मिळतात. मात्र श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण या देवतांच्या तसबिरी किंवा मूर्ती या बिना मिशीच्याच पाहायला मिळतात. ईश्वर चिरतरुण असतात अशी मान्यता असल्याने तसबिरी किंवा मुर्त्यांमध्ये देवतांना मिशी रदखवली जात नाही. मात्र संभाजी भिडे यांची मागणी या मतापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यासाठी संभाजी भिडे यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना तशाप्रकारची विनंती देखील केलीये. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला मिशा असणं केवळ ते पुरुष देवता असल्याने महत्त्वाचं असल्याचं समजतं.   

Red Alert Mumbai: मुंबईत NDRF च्या तुकड्या सज्ज, नागरिकांनी सतर्क राहा... 

सत्येंद्र दास यांचं संभाजी भिडे यांना उत्तर 

अयोध्येतील राम मंदिरातील प्रमुख पुजारी सत्येंद्र दास गुरुजींनी संभाजी महाराजांना चुकीचं ठरवलं आहे. कुठेही श्रीराम, श्रीकृष्ण आणि शिव शंकराच्या मूर्तीमध्ये मिशी नसते कारण हे तीनही देव 'षोडषवर्षीय' म्हणजेच सोळा वर्षांचे मानले जातात. जोपर्यंत देव पृथीवर आहेत तोपर्यंत त्यांचं वय हे १६ वर्षेच राहील असं सत्येंद्र दास गुरुजींनी सांगितलंय.  त्यामुळे प्रभू श्रीरामांची कायम तरुण अवस्थेतच पूजा केली जाते. संभाजी भिडे यांनी केलेली मागणी चुकीची आहे. कुठेही श्रीरामांची मूर्ती मिशी सहित नाही आणि जगात कुठे तशी मूर्ती असेल तर ती संभाजी भिडे यांच्यासारख्या अज्ञानी माणसांमुळेच असेल असंही सत्येंद्र दास म्हणालेत. 

बरं संभाजी भिडे यांची मागणी काही अनोखी नाही. जगात कुठेच श्रीरामांच्या मूर्तीवर मिशा नाहीत असंही नाहीये. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये प्रभू श्रीरामांचं असं एक मंदिर आहे जिथं श्रीरामांना मिशी आहे. सोबतच प्रभू लक्ष्मण यांना देखील मिशी आहे. कुमारपुरामधील हे मंदिर तब्बल दीडशे वर्ष जून असल्याचं बोललं जातं. इथल्या मान्यतेनुसार जर दशरथ यांच्या दाढी मिशा असू शकतात तर श्रीरामांच्याही दाढी मिशा नक्की असतील. 

Mumbai Rain Updates: गरज असेल तरच बाहेर पडा!, मुंबईत रात्रभर तुफान पाऊस

याशिवाय ओडिशामधील वडगावमध्येही असं एक मंदिर आहे जिथे प्रभू श्रीरामांची मिशीसहित मूर्ती आहे. असं मानलं जातं की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण त्यांच्या वनवासादरम्यान ऋषी अत्री यांच्या आश्रमात आले होते. ऋषी अत्री यांनी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचं उत्तम स्वागतही केलं. श्रीराम तिथून गेलेत तेंव्हा ऋषींनी तिथल्या एका खडकातून श्रीरामांची मूर्ती बनवली. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात तिथं गेले होते म्हणून इथली लोकं असं मानतात की त्यांची दाढी आणि मिशी वाढली असावी. म्हणूनच इथल्या मूर्तीला दाढी आणि मिशी आहे. 

याशिवाय राजस्थानातील एका हनुमान मंदिरात हमुमानाच्या मूर्तीला मिशा आहेत. हे हनुमान मंदिर या मिशांमुळे लोकप्रिय आहे. 

inside story on why sambhaji bhide is demanding statue of prabhu shriram with mustache 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inside story on why sambhaji bhide is demanding statue of shriram with mustache