पुराव्याअभावी भरकटला तपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

ठाणे - दोन हजाराच्या पैजेसाठी दिवा स्थानकाजवळील रेल्वे रुळावर लोखंडी तुकडा टाकल्याची कबुली देणाऱ्या पाचही आरोपींकडून अद्याप कुठलाच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती आला नसल्याने या प्रकरणाचा तपास भरकटला आहे.

ठाणे रेल्वे पोलिसांच्या तपासात आरोपींचे मोबाईल लोकेशन घटनास्थळापासून दूरवर आढळल्याचे समोर आल्याने ठाणे पोलिसांच्या कथित कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असताना ठाणे पोलिसांनी मात्र आरोपींकडे मोबाईलच नसल्याचा दावा करून रेल्वे पोलिसांवर तोंडसुख घेतले आहे. दरम्यान, अद्याप कुठलेही प्रत्यक्षदर्शी अथवा परिस्थितीजन्य पुरावा हाती न आल्याने सर्व आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवा स्थानकानजीक मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्‍स्प्रेसच्या मार्गात २४ जानेवारीला रात्री १०.३०च्या सुमारास मोठा रुळाचा तुकडा टाकण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर हा घातपाताचा प्रकार असल्याच्या शक्‍यतेने याच्या तपासासाठी ठाणे पोलिस, एटीएस आणि रेल्वे पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. अखेर मुंब्रा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दानिश अकबर शेख (वय २६), सूरज दिनेश भोसले (२५), मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख (३६), नजीर उस्मान सय्यद (२४) आणि जयेश नागेश पारे (३०) या पाच जणांच्या टोळक्‍याला अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबावरून दिवा रूळ प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचा दावा ठाणे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या पाचही आरोपींना तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. आरोपी ताब्यात दिले; पण घटनेचे पुरावे नसल्याने तपासाची दिशाच भरकटली आहे. रेल्वे पोलिसांच्या तपासात पाचही आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन घटनास्थळापासून दूरवर असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अधिक भाष्य न करता आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याचे सांगून पुढील तारखेला सर्वांची जामिनावर मुक्तता होण्याची शक्‍यता वर्तवली.

रेल्वे पोलिस विरुद्ध ठाणे पोलिस
दिवाप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पकडलेले पाचही आरोपी नशेखोर, गर्दुल्ले असल्याने त्यांच्या कबुलीजबाबावर कितपत विश्‍वास ठेवावा. या घटनेचा एकही साक्षीदार अथवा परिस्थितीजन्य पुरावा नाही. रेल्वे पोलिसांच्या तपासात आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन दिव्याऐवजी मुंब्रा आणि नाशिक येथे असल्याचे उघड झाल्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र तायडे यांना विचारले असता, हा राष्ट्रीय पातळीवरचा गुन्हा असून, आरोपींचा कबुलीजबाब रेकॉर्ड आहे. अटक आरोपी मोबाईल वापरत नसून जे वापरतात त्यातील एकाचा मोबाईल नाशिक येथे पत्नीकडे, तर दुसऱ्याचा मोबाईल बहिणीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Investigating for want of evidence