इक्‍बाल मिर्चीच्या फ्लॅटचा आज लिलाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

साडेतीन कोटींची मालमत्ता

मुंबई : पाकिस्तानमध्ये लपलेला कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा विश्‍वासू साथीदार इक्‍बाल मिर्ची याच्या सांताक्रूझ येथील मालमत्तांचा लिलाव मंगळवारी (ता. 19) करण्यात येणार आहे. या मालमत्तांची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मगलर्स अँड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिप्युलेटर्स ऑथॉरिटीमार्फत (सफेमा) या आलिशान सदनिकांचा लिलाव करण्यात येणार आहे. 

जुहू तारा रोड परिसरात इक्‍बाल मिर्ची याचे दोन आलिशान फ्लॅट आहेत. या सदनिकांची किंमत तीन कोटी 45 लाख रुपये आहे. त्यापैकी 1245 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या फ्लॅटचा लिलाव मंगळवारी नरिमन पॉईंट येथील सफेमाच्या कार्यालयात होईल. यापूर्वी सफेमाने दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचाही लिलाव केला होता.

दाऊदचा विश्‍वासू असलेल्या मिर्चीला 1994 मध्ये तडीपार करण्यात आले होते. दाऊद टोळीचा अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय तो सांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांना 1988 पासून हव्या असलेल्या मिर्चीने 1995 मध्ये भारतातून पलायन केले. 

भायखळा येथे मिर्चीच्या कुटुंबीयांचा मिरची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. अमली पदार्थांच्या, प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीसाठी तो कुप्रसिद्ध आहे. भारतातून फरार झाल्यानंतर त्याने दुबईत साम्राज्य निर्माण केले. लंडन येथे 14 ऑगस्ट 2013 रोजी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात उघड झाले आहे. त्यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिंक रिऍल्टर्स व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. यांना विकण्यात आल्या.

वरळीतील मालमत्ता 2011 मध्ये सनब्लिंक रिऍल्टर्सला विकण्यात आली. 
सिजय हाऊस ही 15 मजल्यांची इमारत मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तपणे 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता 2007 मध्ये मिर्चीच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली. त्याशिवाय खंडाळ्यात सहा एकर जमीन मेसर्स व्हाईट वॉटर लि. यांच्या नावावर आहे.

या मालमत्तेचा ताबा मिर्चीच्या दोन मुलांकडे आहे. मुंबईतील साहिल बंगला मिर्चीची पत्नी व मुलाच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता मिर्चीची बहीण व मेहुण्याच्या ताब्यात आहे. 

मुंबईत 500 कोटींच्या मालमत्ता 
भायखळा येथील रोशन हाऊस चित्रपटगृह, क्रॉफर्ड मार्केट येथे तीन दुकाने, जुहू तारा रोड येथे मिनाज हॉटेल व पाचगणी येथे बंगला अशा त्याच्या मालमत्ता असल्याची माहिती ईडीला मिळाली. मुंबईतील या सर्व मालमत्तांची किंमत तब्बल 500 कोटी रुपये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iqbal Mirchi-linked flat to be auctioned today