esakal | वसई-विरार मध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित ?

बोलून बातमी शोधा

covid 19 test
वसई-विरार मध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित ?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: वसई-विरारमध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळत आहे. कोविड चाचण्या होणाऱ्यांपैकी निम्म्या व्यक्तींना कोविडची बाधा असल्याचे आढळत आहे, तर या महानगर पालिकेच्या हद्दीत मुंबई महानगर पालिकेच्या तुलनेने अवघ्या तीन टक्क्यांच्या आसपास चाचण्या होत आहेत. महामुंबईतील उल्हास नगर महानगर पालिकेकडून सर्वात कमी कोविड चाचण्या होत आहेत. मुंबईच्या अवघ्या दोन टक्के चाचण्या या महानगर पालिकेत होत आहेत.

हेही वाचा: भाड्याच्या इलेक्ट्रीक कारसाठी BMC खर्च करणार १ कोटी ६२ लाख

वसई विरार महानगर पालिकेच्या हद्दीत शुक्रवारी 1 हजार 382 चाचण्या झाल्या. तर,814 रुग्ण आढळले. म्हणजे चाचण्या झालेल्या पैकी 58.90 टक्के जणांना कोविडची बाधा असल्याचे आढळले आहे. मात्र,कोविड बाधित काही व्यक्तींच्या चाचण्या महानगर पालिकेच्या हद्दीबाहेर झाल्या आहेत. त्यांचे निवास वसई विरार महानगर पालिकेत असल्याने त्यांची नोंद पालिकेने केली आहे, असा दावा वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे.

हेही वाचा: संकटकाळात CIDCO उभारतेय मोठी हॉस्पिटल्स

नागरीक चाचण्या करायलाच तयार होत नाही असे कारणही आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. या बाबत आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जुईली वनमाळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या,‘रुग्ण शहराचा निवासी असल्याने त्यांची नोंद महानगर पालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे. मात्र,काही बाधितांची चाचणी दुसऱ्या शहरांमध्येही झालेली असते, असा दावा त्यांनी केला. चाचण्या करण्यास नागरीकांकडून टाळाटाळ केली जाते.

मात्र, आता चाचण्याची संख्या वाढवली आहे. संचार बंदीत फिरणाऱ्यांची चाचणी केली जाते, तर शहराच्या हद्दीतील तिन्ही रेल्वे स्थानकांवरही चाचण्या केल्या जात आहेत, असेही डॉ. वनमाळी यांनी सांगितले. मुंबईत शुक्रवारी 43 हजारावर चाचण्या झाल्या होत्या. तेव्हा वसई विरार महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 382 चाचण्या आणि उल्हास नगर महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 2 चाचण्या झाल्या होत्या.

कॉन्टक्ट ट्रेसिंगची बोंब

मुंबईत बाधीत आढळल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील किमान पाच ते सहा जणांच्या चाचण्या केल्या जातात. मात्र,वसई विरार महानगर पालिकेच्या आकडेवारी लक्ष टाकल्यास असे कॉन्टक्ट ट्रेसिंगही होताना दिसत नाही. तशीच परीस्थीती उल्हास महानगर पालिकेची आहे.