इसिसच्या फायटर ड्रग्सचा साठा अंधेरीतून जप्त

अनिश पाटील
सोमवार, 16 जुलै 2018

मुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे फायटर ड्रग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्रेमेडॉलच्या सव्वा दोन लाख गोळ्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने अंधेरीतील उच्चभ्रू वस्तीतून जप्त केल्या आहेत. या गोळ्यांचा पुरवठा इसिसशी संबंधित गटांना होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. बंदी घातल्यानंतर मुंबईतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेमेडॉलचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गोरेगावमध्ये राहणाऱ्या भावेश शहा या व्यक्तीच्या अंधेरीतील कार्यालयातून हा साठा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत 50 लाख रुपये आहे. शहा याला डीआरआयने 28 जूनला अमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही माहिती डीआरआयला मिळाली होती.

जखमांच्या वेदना शमवण्यासाठी वापर
युद्धात जखमी झाल्यानंतर वेदना शमवून लढण्यासाठी इसिसचे दहशतवादी ट्रेमेडॉलचा वापर करतात. ही संघटना जगभरातील स्त्रोतांकडून या गोळ्या मागवते. त्यामुळे जगभरातील देशांनी या गोळ्यांवर बंदी घातली आहे. भारतातही या वर्षी एप्रिलमध्ये या गोळ्यांवर बंदी घालण्यात आली. सध्या जगभरात या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे भाव तीन-चार पटींनी वाढले आहेत. मे महिन्यात पालघर येथील कारखाना आणि जेएनपीटी परिसरा नजीकच्या द्रोणागिरी परिसरातील गोदामातून ट्रेमेडॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

Web Title: ISIS Drugs Seized Crime