
Vasai-Virar Dangerous buildings
ESakal
वसई : वसई-विरार महापालिका दरवर्षी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. त्या इमारती खाली करण्यासाठी संबंधितांना नोटिसा दिल्या जातात, मात्र अनेक रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीत राहतात. त्यामुळे अनेकदा पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडतात. या जीर्ण इमारती मृत्यूचे सापळे बनत आहेत, हे गेल्या महिन्यातील दुर्घटनेमुळे समोर आले. शहरातील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. त्यांचे स्लॅब कोसळत आहेत. शहरातील नादुरुस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.