डोंबिवलीतील बालविवाहाबाबत समोर आली धक्कादायक माहिती; मुलीनेच केला होता... 

marrige
marrige

डोंबिवली :  डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरात लॉकडाऊन काळातही एका 27 वर्षाच्या मुलाचा एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह पार पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर या मुलीवर कोणी सक्ती तर केली ना? कोणाचा दबाव तर नाही ना? हे लग्न बळजबरीने तर लावले गेले नाही ना?  अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, या 15 वर्षीय मुलीचे सबंधित तरुणाशी प्रेमसंबंध असून तिने वारंवार हट्ट केल्यानेच हा विवाह संपन्न झाला. इतकेच नाही तर एकदा तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती मानपाडा पोलिसांनी 'सकाळ'ला दिली. 

कोपरगाव ( जि. अहमदनगर)  येथे राहणाऱ्या 15 वर्षीय बालिकावधूचे गेल्या अनेक दिवसांपासून  मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील आणि सध्या डोंबिवलीत राहणाऱ्या 27 वर्षीय  तरुणासोबत  प्रेमसंबंध जुळले होते. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक लागत असल्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली आणि पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर लग्न करेल तर याच मुलाशी, असा हट्ट या बालिकावधूने धरला होता. एक तर लग्न लावा; नाहीतर मला मुलाकडे नेऊन सोडा, असा तगादा तिने आपल्या वडिलांकडे लावला. अन्यथा मी जीव देईल, असेही ती कुटुंबीयांना म्हणू लागली. 

वेळ पडली तर "लिव्ह इन रिलेशनशीप"मध्येही राहण्याची तयारीही बालिकावधूने दाखविली होती. एकदा आत्महत्येचाही प्रयत्न या मुलीने केला असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. अखेर आपल्या मुलीच्या हट्टाला कंटाळून हतबल झालेले वडिल तिला डोंबिवलीला घेऊन आले आणि तिचा विवाह तिच्या मनपसंत तरुणाशी लावून दिला. या बालविवाहामध्ये निर्माण झालेल्या नवीन ट्विस्टमुळे अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेचा मुद्दा समोर आला असून या वयात मुलांना समुपदेशनाची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

नेमके काय घडले? 
डोंबिवलीतील मानपाडा परिसरातील एका सोसायटीत गुपचूपपणे  बालविवाह संपन्न होत असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मानपाडा पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहचण्याअगोदरच विवाह संपन्न झाला होता. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी नवविवाहित वरासह दोन्हीकडच्या कुटुंबियांना अटक केली. 

मुलीचे आणि सबंधित तरुणामध्ये प्रेम होते. मुलीच्या हट्टामुळे तिचे नातेवाईक तिला लॉकडाऊन असतानाही डोंबिवलीत घेऊन आले. एकदा या मुलीने सुसाईडचाही प्रयत्न केला होता. तिच्या हट्टामुळेच आणि मर्जीने हा विवाह संपन्न झाल्याचे समोर आले आहे. 
-दादाहरी चौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानपाडा. 

अल्पवयीन मुल-मुली ही शारीरिक आकर्षणाकडे जास्त ओढली जातात. या वयात मुले असंमजस असतात. लहानापासूनच पालकांनी मुलांचा अतिहट्टीपणा रोखणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. वेळेत समुपदेशन करणे हाच योग्य उपाय आहे.
- डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचारतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com