आयटीआयच्या दर्जावृद्धीसाठी खासगी कंपन्यांसोबत करार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कामाचा अनुभव

मुंबई : कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालयाने देशभरातील आयटीआयमधील प्रशिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि तरुणांना चांगले रोजगार मिळावेत यासाठी सहा महिन्यांत 719 खासगी कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यामुळे आयटीआयमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षणाबरोबरच कामाचा प्रत्यक्ष अनुभवही मिळेल. त्यातून कुशल कामगार घडण्यास मदत होणार आहे. 

कुशल कामगार घडवण्यासाठी केंद्र सरकारने कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला आहे. त्यासाठी देशातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या आयटीआय संस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्यानुसार आयटीआयमध्ये "ड्युअल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग' (डीएसटी) उपक्रमांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच उत्तम कौशल्याधारित विद्यार्थी घडवण्यासाठी खासगी कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. 

विशेष म्हणजे, कौशल्य विकास आणि रोजगार मंत्रालयाने मागील तीन वर्षांत आयटीआयमधील प्रशिक्षणासंदर्भात खासगी कंपन्यांसोबत 136 करार केले होते. त्यामुळे सहा महिन्यांत झालेले 719 करार लक्षणीय ठरले आहेत. 
खासगी कंपन्यांना सोबत घेऊन त्यांच्या गरजांनुसार कौशल्याधारित विद्यार्थी घडवण्यासाठी 2016 मध्ये सरकारकडून "डीएसटी' पद्धत अमलात आणण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना आयटीआयमार्फत पुस्तकी ज्ञान देण्यात येत असून, प्रत्यक्ष कामाचा अनुभव व अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य करार झालेल्या कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. 

...........

संस्थाप्रमुखांना अधिकार 
या वर्षी "डीएसटी'च्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे आयटीआयच्या प्रमुखांनाच थेट कंपन्यांसोबत करार करता येईल. त्यासाठी त्यांना एमएसडीईच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. या अटींचे पालन करत सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात करार झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे आयटीआयमधील सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI will mentain training quality