जयदत्त क्षीरसागर अखेर शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

क्षीरसागर यांच्यावर शिवसेनेत मोठी जबाबदारी देण्यात येईल. त्यांना ‘राष्ट्रवादी’त जो मान मिळाला नाही, तो शिवसेनेत मिळेल.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. 

‘ज्या पक्षाचे घर मी बांधले. मोदी लाटेतही बीडमधून एकमेव आमदार म्हणून निवडून आलो. त्याच पक्षाने सतत अपमानास्पद वागणूक दिली,’ अशा शब्दांत क्षीरसागर यांनी भावना व्यक्‍त केल्या. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व क्षीरसागर यांच्यात मतभेद सुरू होते. क्षीरसागर यांनी सुरेश धस यांच्या विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान भाजपला मदत केली; तर लोकसभेच्या प्रचारात त्यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला होता. ते शिवसेना-भाजपच्या संपर्कात होते. त्यांचा बीड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे मानले जाते. शिवसेना भवनामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधले.

जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचे दुःख झाले आहे. शरद पवार आणि मी क्षीरसागर यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र मी अपयशी ठरलो. 
- छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaydutt Kshirsagar Entry in Shivsena Politics