भाजपला पुन्हा मोठा दणका; उद्या आणखी एक नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

संजय मिस्कीन
Monday, 23 November 2020

भारतीय जनता पक्षात सध्या मनमानी सुरू असून आयाराम नेत्यांवर सर्वाधिक भरोसा असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे. 

मुंबई, ता. 23 : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर  भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी वाढत आहे. भाजपचे जुनेजाणते नेते फडणवीस यांच्या नेतृत्वात नाराज असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅग्रेसमधे प्रवेश करत आहेत. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपचे बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. 

भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश उद्या होत असल्याने भाजपला हा दणका असल्याची चर्चा आहे. 

महत्त्वाची बातमी : "आज कसलीतरी ANNIVERSARY आहे म्हणे!"; 'त्या' शपथविधीवरून काँगेसचा टोला कुणाला ?

उद्याच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित राहणार आहेत. 

भारतीय जनता पक्षात सध्या मनमानी सुरू असून आयाराम नेत्यांवर सर्वाधिक भरोसा असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे. 

जयसिंगराव गायकवाड यांनी या अगोदर देखील भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यामधे ते विजयी देखील झाले होते.  गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात शालेय जिवनापासून काम केले आहे. 

महत्त्वाची बातमी :  राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

मात्र, सध्या पक्षात आयाराम नेत्यांच्या पुढे मुळ निष्ठावंताना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात आगामी राजकारणाची वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

jaysinghrao gaikwad to join nationalist congress party after eknath shinde big blow to BJP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jaysinghrao gaikwad to join nationalist congress party after eknath shinde big blow to BJP