मासेमारी हंगामासाठी जेट्टी सजल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नारळी पौर्णिमेच्या सणासाठी नवी मुंबई आणि परिसरातील कोळीवाडे आणि ठिकठिकाणच्या मासेमारी जेट्टी सजल्या आहेत. शासनाने खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी १ ऑगस्टलाच उठवली असली; तरी नवी मुंबई परिसरातील अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच मासेमारी सुरू करतात. त्यामुळे सध्या दिवाळे, वाशी, करावे, नेरूळ, सारसोळे, वाशी, बोनकोडे, घणसोली, ऐरोली, दिवा भागात या सणाची जोरदार तयारी सुरू आहे.

नवी मुंबई ः नारळी पौर्णिमेच्या सणासाठी नवी मुंबई आणि परिसरातील कोळीवाडे आणि ठिकठिकाणच्या मासेमारी जेट्टी सजल्या आहेत. शासनाने खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी १ ऑगस्टलाच उठवली असली; तरी नवी मुंबई परिसरातील अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच मासेमारी सुरू करतात. त्यामुळे सध्या दिवाळे, वाशी, करावे, नेरूळ, सारसोळे, वाशी, बोनकोडे, घणसोली, ऐरोली, दिवा भागात या सणाची जोरदार तयारी सुरू आहे.

दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतल्याने सोमवारी (ता.१२) दिवसभर जेट्टीचा परिसर सजवण्यासाठी खाडीकिनारी कोळीबांधवांची लगबग सुरू होती. दिवाळे, सारसोळेसह विविध ठिकाणच्या खाडीकिनारी पताका लावून सजावट करण्यात आली होती. दिवाळे गाव येथील सिद्धी ग्रुप, सारसोळे गाव येथील सारसोळे ग्रामस्थ; तसेच वाशी गाव येथील डोलकर मित्र मंडळाने नारळी पौर्णिमेची तयारी सुरू केली आहे. बॅंडच्या तालावर नारळाची गावा-गावांतून वाजतगाजत मिरवणूक काढली जाणार आहे. दिवाळे, सारसोळे गावात अनेक वर्षे नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जात होता. दर्याला शांत करण्यासाठी परंपरेप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करून ‘मासेमारी करण्यासाठी बळ दे’, असे साकडे घातले जाणार असल्याची माहिती कोळी बांधवांनी दिली.

नवी मुंबई विमानतळाच्या भरावामुळे गेली दोन वर्षे दिवाळे गावातील मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यात अनेकांच्या उदरनिर्वाहावर गदा आली असतानादेखील मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेच्या सणासाठी सज्ज झाले आहेत.
- भूषण कोळी, ग्रामस्थ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jetty decoration for fishery season