‘ज्वेल ऑफ’ बनला धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बनवलेल्या ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ येथे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथे दिवाबत्तीची पुरेशी सोय नसल्याने नागरिकांना लुबाडण्याची भीती आहे. याशिवाय शेजारच्या तलावात मलवाहिन्या सोडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथे बनवलेल्या ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ येथे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथे दिवाबत्तीची पुरेशी सोय नसल्याने नागरिकांना लुबाडण्याची भीती आहे. याशिवाय शेजारच्या तलावात मलवाहिन्या सोडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

महापालिकेने नेरूळ येथे अत्याधुनिक ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’सारखे आकर्षक आणि सुसज्ज प्रेक्षणीय स्थळ बनवले आहे. त्याला नागरिकांनीही पसंती दिली आहे. शहरातील अनेक ठिकाणचे नागरिक येथे येतात. आकर्षक आसन व्यवस्था, तलाव, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक आदींची सोय असल्याने परिसरात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी येतात. सध्या पाऊस सुरू झाला, तरी येथे येण्याचा नागरिकांचा ओढा कमी झालेला नाही. या ठिकाणी सुमारे अडीच किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. तरुणाईबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर फेरफटका मारण्यासाठी येथे येतात. नागरिकांच्या सोईसाठी पालिकेने या ठिकाणी आकर्षक विद्युत खांब बसवले आहेत; परंतु तेथील विजेचे दिवे अनेकदा बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. येथील तलावात नेरूळ गावातील मलवाहिन्यांचे पाणी शिरत असल्याने पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाम बीच मार्गाच्या शेजारच्या ज्वेल ऑफ नवी मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संरक्षक भिंत नाही. त्यामुळे या ठिकाणी सहजरित्या प्रवेश करता येतो; परंतु या परिसरात येणारी मंडळी पाम बीच मार्गाच्या शेजारीच वाहने उभी करीत असल्यामुळे अपघात होतात. गेल्यावर्षी येथील ३० हून अधिक विजेच्या खांबांची अज्ञातांकडून मोडतोड झाली होती. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही पालिकेने सीसी टीव्ही कॅमेरे येथे बसविलेले नाहीत. पावसाळा सुरू झाला, तरी झाडांची छाटणी केली नसल्याने त्यांच्या फांद्या कोसळून अपघात होण्याची भीती आहे. या परिसराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमले आहेत; परंतु ते अपुरे आहेत. गर्दुल्ले आणि मद्यपींचा येथे वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नेरूळ गावातील ड्रेनेजलाईनचे काम लवकरच करण्यात येणार असल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलावात येणारे मलवाहिन्यांचे पाणी बंद होईल. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लवकरच सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, दोन दिवसांत झाडांच्या छाटणीचे काम करण्यात येईल.
- मोहन डगांवकर,  अतिरिक्त आयुक्त

Web Title: jewel of navi mumabi became dangerous