ज्वेलर्सनेच रचला 18 तोळे दागिने चोरीचा बनाव; वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

विक्रम गायकवाड
Monday, 17 August 2020

नेरुळ सेक्टर-8 मधील सिद्धिविनायक ज्वेलर्समधून 12 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची झालेली चोरीची घटना ही बनाव असल्याचे उघडकीस आले आहे. ज्वेलर्स मालकानेच कर्जबाजारीपणामुळे आपल्या दुकानातील 18 तोळे दागिन्यांच्या चोरीचा बनाव रचल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी ज्वेलर्स मालकाला ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-8 मधील सिद्धिविनायक ज्वेलर्समधून 12 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची झालेली चोरीची घटना ही बनाव असल्याचे उघडकीस आले आहे. ज्वेलर्स मालकानेच कर्जबाजारीपणामुळे आपल्या दुकानातील 18 तोळे दागिन्यांच्या चोरीचा बनाव रचल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी ज्वेलर्स मालकाला ताब्यात घेतले आहे.

ही बातमी वाचली का? शरद पवारांची ब्रीच कँडीमध्ये झाली कोरोना टेस्ट, रिपोर्टबद्दल राजेश टोपे म्हणालेत...

नेरुळ सेक्टर-8 मधील तृफ्ती शॉपींग सेंटरमध्ये अनिकेत शिंदे (28) यांच्या मालकीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (ता.13) पहाटेच्या सुमारास ग्रिलचा दरवाजा कटरने कापुन, दुकानातील लॉकर तोडुन तब्बल 18 तोळे वजनाचे 12 लाख 7 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने चोरुन नेल्याची तक्रार अनिकेत यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी तत्काळ त्यांच्या सिद्धिविनायक ज्वेलर्स दुकानात धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला होता. या गुह्याच्या तपासादरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्वेलर्स दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात कुणी दागिने ठेवत नसल्यामुळे तसेच ज्वेलर्स दुकानातील तोडण्यात आलेल्या लॉकरवरुन पोलिसांना या चोरीबाबत संशय आला. त्यानुसार त्यांनी तपासास सुरूवात केली.

ही बातमी वाचली का? BREAKING : मुंबईतील आयकॉनिक क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागली आग

या दरम्यान, तक्रारदार अनिकेत शिंदे याचा पार्टनर रविवारी गावावरुन परत आल्यानंतर त्याच्या बोलण्यात तफावत आढळून आल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सचिन मोरे व त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत शिंदे व त्याचा पार्टनर या दोघांना पोलीस ठाण्यात पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांनी अनिकेत याची चौकशी केली असता, अनिकेत यानेच आपल्या ज्वेलर्स दुकानातील दागिने चोरीला गेल्याचा खोटा बनाव रचल्याचे कबूल केले. कर्जबाजारीपणामुळे त्याने हा प्रकार केल्याचे त्याच्या चौकशीत उघडकिस आले. त्यानुसार पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेतले आहे.  
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewelry shop in Nerul burglary revealed, shop owner burglary due to debt