रिक्षात विसरलेले मुलीच्या लग्नासाठीचे दागिने महिलेला मिळाले परत

दिनेश गोगी
रविवार, 19 मे 2019

उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे.

उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे.

कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी या महिलेने काल सायंकाळी शिरू चौक भागातील सोन्याच्या बाजारपेठेतून तिच्या आज 18 तारखेला असणाऱ्या मुलीच्या लग्नासाठी अडीच लाख रूपयांचे दागिने खरेदी केले होते. त्यांनी इतर वस्तू देखील खरेदी केल्या. परत येताना संगीता यांना रिक्षाच्या मागे ठेवलेल्या बॅगेचा विसर पडला. हि बाब लक्षात येताच त्यांनी नेहरू चौकातील उल्हासनगर वाहतूक उपशाखेतील पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना प्रकार सांगितला. चव्हाण यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा व चालकाचा शोध शिरु चौकातील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरु केला. 2 ते 3 तासात  वाहन अॅप मार्फत रिक्षाचा शोध लावून रिक्षा चालक प्रदिप शिरसाट यास चौकीत बोलावून घेतले. शिरसाट यांनी आताच रिक्षा साफ करताना रिक्षाच्या मागे बॅग असल्याचे निदर्शनास आल्यावर बॅग सांभाळून ठेवली व ते पोलिस ठाण्यात हजर करणारच होते असे सांगितले. 

गहाळ बॅग परत मिळाल्यावर संगीता शेट्टी यांना नेहरू चौकीत बोलावून घेतले. सदर महिला आपले नातलगासह चौकीत आल्यावर तीने रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने असलेले बॅगेची तपासणी करुन खात्री केली. आपले दागिने आपन विसरलो व परत मिळाल्याने दुःख व आनंद अशा द्विधा अवस्थेत तिला रडू कोसळले.

मुलीच्या लग्नात इज्जत वाचली असे म्हणत तिने देवाचे व पोलीसांचे आभार मानले.  रिक्षा चालकास धन्यवाद देत रोख बक्षीस दिले. तिने 18 मेला उत्सव लॉन्स मध्ये असणाऱ्या मुलीच्या लग्नात येऊन आशीर्वाद देण्याची विनंती वाहतूक शाखेच्या पोलिसांना केली. या विनंतीला मान देऊन आज रात्री संपन्न होणाऱ्या संगीता शेट्टी यांच्या मुलीच्या लग्नात जाऊन वाहतूक शाखेचे पोलिस आशीर्वाद देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोहिदास पवार यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Jewelry Of two lakhs left in the rickshaw have returned to women