Jitendra Awad : डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा -जितेंद्र आव्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awad

Jitendra Awad : डोंबिवलीकरांच्या सहनशीलतेला मानाचा मुजरा -जितेंद्र आव्हाड

डोंबिवली : सुशिक्षित, सुसंस्कृत, साहित्यिक, कवी अशा सगळ्या लोकांचा भरणा असलेल्या शहरात एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही. मग यांची बुद्धी कोठे गेली. निदान कमीत कमी या शहराचा विकास झाला नाही हे तरी त्यांच्या लक्षात यायला पाहीजे. की डोळे बांधून फिरायचे आणि मतदान करायचे.

असे काही डोंबिवलीत घडत नाही ना, असा विचार माझ्यासारख्याच्या डोक्यात येतो. जो कोणी दुसरा तिसरा माणूस बाहेरुन येईल तो डोंबिवलीच्या रस्त्यावरुन जेव्हा फिरेल तो डोंबिवली मतदारांविषयी हास्य विनोद करेल त्याबद्दल त्यांनी खात्री बाळगावी अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीकरांवर केली. अन्याय आणि अत्याचार होत असताना तो सहन करुन घरी टिव्ही कसा बघता बसायचा हे उभ्या महाराष्ट्राने डोंबिवलीकरांकडून शिकावं, त्यांच्या सहनशीलतेला माझा मानाचा मुजरा असे म्हणत त्यांनी येथील मतदारांचे कान पिळले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्ह्यातर्फे डोंबिवली गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, वंडार पाटील, शिवसेनेचे ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, विवेक खामकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डोंबिवलीतील समस्यांवरुन आमदार आव्हाड यांनी येथील मतदारांचे चांगलेच कान पिळले. ते म्हणाले, येथे येत असताना प्रत्येक मिनिटाला रस्त्यावर खड्डे येत होते.

तुमच्यापेक्षा माझा कळवा मुंब्रा लाख पटीने बरा आहे असे म्हणत त्यांनी डोंबिवलीतील रस्त्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर आणि डोंबिवली करांवर ताशेरे ओढले. जरा कळवा मुंब्रात येऊन पहा, जो एकेकाळी सर्वात मागासलेला परिसर होता. त्या परिसरात या मग तुम्हाला कळेल की विकास काय असतो. लोक मत कशी काय देतात असा सवाल त्यांनी डोंबिवलीकरांना केला. सुसंस्कृत, सुशिक्षित, विद्येचे माहेर घर असे अनेक बिरुदावली असलेले शहर आहे. जनतेचे वाईट वाटते की कोणत्या आधारावर तुम्ही मते देता असा सवाल त्यांनी केला.

शहरात गुन्हेगारी वाढत असून याविषयी भाष्य करताना आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. एका विचित्र परिस्थितीतून ठाणे जिल्हा जात आहे. पोलीस काय करतात हेच मुळात कळायला मार्ग नाही. राजकीय दहशत पोलिसांच्या मार्फत माजविली जात आहे. कायद्याचे राज्य आहे की नाही. जर्मनीची आर्मी होती परंतु हिटलरची जशी स्वतःची आर्मी आणि मिलटरी होती ते वाट्टेल ते करायचे असा प्रकार काहीसा ठाणे जिल्ह्यात होताना दिसत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. ज्या पद्धतीने पोलीसांच्या कारवाईचा अतिरेक होतो त्याचा कोठे तरी उद्रेक होईल. हिटलर देखील जनतेच्या रेट्या पुढे टिकू शकला नव्हता असा इशारा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना देऊ केला आहे.

भाजप म्हटले की लोकांच्या मनात एक आदर असतो सुशिक्षित सुसंस्कृत कर्तव्यनिष्ट असे सगळे रंग लावून ते बाजारात येतात पण आता वेगळाच रंग आहे. पोलिसांच्या मार्फत राजकीय दहशत माजवली जात आहे. ज्या पद्धतीने पोलिसी कारवाई होते त्यांचा अतिरेक ठाणे जिल्ह्यात होतोय. लोक शांत आहेत पण हा ज्वालामुखी आहे, याचा उद्रेक कधी होईल सांगता येत नाही. कायदा हातात घेणार नाही. पण पोलिसांच्या विरोधात निशस्त्र, अहिसंक आंदोलन उभे करु असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

राजकारणात एक अलिखित नियम असतो. राजकारणात वैचारिक अधिष्ठान घेऊन लोक चालत असतात त्यांना त्यांच्या विचाराने चालू द्या. शेवटी जनता ठरवेल कोणते विचार स्विकारायचे असा टोला त्यांनी शिवसेनेत सुरु असलेल्या ठाकरे शिंदे गट वादावरुन शिंदे गटाकडून होणाऱ्या दडपशाहीवर मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्यात गुंडांना जो अभय, पोलिसी संरक्षण मिळते आणि ते दहशत माजवित आहेत. त्यामुळे सत्ताधारी बदनाम होतात हे सत्ताधाऱ्यांना कसं कळत नाही असा सवाल करत ते म्हणाले, भोपर मधील संदीप माळी यांच्यावर 25 हून अधिक गुन्हे आहेत तरी त्याच्यावर तडीपारीची कारवाई होत नाही. अस म्हणतात की डोंबिवली हे सुसंस्कृत, बुद्धिवंतांचे, साहित्यिकांचे, ज्ञानाचा महासागर असलेले शहर आहे. त्या शहरात अशा प्रकारच्या गोष्टी होणे हे या शहराची नामुष्की असून ते शहराला बदनाम करणारे आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतील भाषण हे योग्य भाषेत होणे अपेक्षित आहे. काही चुकीची वक्तव्य झाली तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावर आव्हाड यांनी कारवाई करा जेल मध्ये घाला, फाशी थोडीच देणार आहेत असे बोलत फडणवीस यांचे हे विधान उडवून लावले. ते म्हणाले, राज्य तुमचे आहे कोणते शब्द संसदीय आहेत कोणते शब्द असंसदीय आहेत हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कारवाई करा जेल मध्ये घाला, फाशीच थोडी देणार आहात...असे बोलले.

ठाणे जिल्ह्याचे पालकत्व साताऱ्याचे शंभूराज देसाई यांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची निवड केली आहे. यावर गुगली टाकत आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिका केली. पालकमंत्र्यांबद्दल मला काही बोलायचे नाही. ते कार्यक्षम आहेत आठ आठ जिल्हे ते सांभाळू शकतात. ते कार्यक्षम असल्याने त्यांना ते दिलेत आपण काय बोलावे असे ते म्हणाले