होर्डिंगसाठी पाच लाखांचा हप्ता घेणारा "अविचारी' खासदार कोण? 

होर्डिंगसाठी पाच लाखांचा हप्ता घेणारा "अविचारी' खासदार कोण? 

ठाणे - काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून, ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डिंग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे; मात्र ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने होर्डिंग उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा "अविचारी' खासदार कोण आहे, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते. आव्हाड म्हणाले की, घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग पडले आहे. या होर्डिंगची उभारणीच बेकायदेशीररीत्या करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने होर्डिंग उभारण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्यांची उंची, रंगसंगती, डोळ्यांवर येणारा तणाव आदी निकष घालून देण्यात आले आहेत; मात्र ठाण्यातील एकाही ठिकाणी होर्डिंगचे नियम पाळण्यात येत नाहीत. बुधवारी दुर्घटनाग्रस्त झालेला होर्डिंग उभारण्यासाठी एका खासदाराने पाच लाख रुपयांचा हप्ता घेतल्याचे समजते. त्यांनी हा हप्ता भागीदार म्हणून घेतला की अन्य कोणत्या प्रकारे घेतला हे माहीत नाही. ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे आणि राजन विचारे हे चार खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपला या प्रकाराशी संबंध नसल्याचे जाहीर करणार आहेत. पालकमंत्री शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबंध नाही, हे जाहीर करावे. सहस्रबुद्धे यांनी विवेकबुद्धीने आपली भूमिका जाहीर करावी. तसेच राजन विचारे यांनीही चुकीचा विचार करू नये. त्यांनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी, असे आव्हान आव्हाड यांनी दिले आहे. त्याचवेळी या अविचारी खासदाराने अशा होर्डिंगला पाठिंबा द्यायचे सोडून देणे गरजेचे असल्याची टीका त्यांनी केली. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आलेली आहे; मात्र ठाणे शहरात घरखरेदी करताना जीएसटी आणि एलबीटी असे दोन्ही कर भरावे लागत आहेत. त्यामुळे ज्यांची एलबीटी घेण्यात आलेली आहे, त्यांना त्यांचे पैसे परत करावेत तसेच एलबीटी पूर्णत: बंद करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. 

वागळेच्या डम्पिंगला दणका 
वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राऊंडमुळे या भागात राहणाऱ्या सुमारे 30 टक्के नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चार दिवसांत हे डम्पिंग ग्राऊंड बंद न केल्यास ते आपण बंद पाडू, असा इशाराही आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, वागळे इस्टेट येथे पर्यावरणाचे कोणतेही निकष न पाळता डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत जर हे डम्पिंग ग्राऊंड महापालिकेने बंद केले नाही तर आपण ते बंद करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला. "ठाणे टुडे'च्या माध्यमातून 3 एप्रिलला या डम्पिंगचे चित्र मांडण्यात आले होते. अशावेळी प्रशासनाने दखल न घेतल्यास राष्ट्रवादीच्या पद्धतीने डम्पिंगचा बंदोबस्त करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com