esakal | बनावट कागदपत्रांच्या मदतीने नोकरीत बढती 
sakal

बोलून बातमी शोधा

file

सिडकोकडून संबंधित कर्मचारी निलंबित; तक्रार दाखल 

बनावट कागदपत्रांच्या मदतीने नोकरीत बढती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून नोकरीत बढती मिळवलेल्या सिडकोच्या कर्मचाऱ्यास घरचा रस्ता दाखवण्यात आला असून, त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राजेश पाटील असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

हेही महत्वाचे...ठाकरे सरकार देणार मुस्लीम समाजाला गिफ्ट 
 

राजेश पाटील हा 1997 मध्ये सिडकोत सुरक्षा रक्षक पदावर रुजू झाला होता. त्यावेळी त्याने उरण येथील वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा सन 1985 चा दहावी नापास झाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. मात्र पाटील याने मार्च 2009 मध्ये सिडकोच्या कार्मिक विभागात दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, तसेच क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचे प्रमाणपत्र सादर केले. यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता पाहून कार्मिक विभागाने त्याला लिपीक-टंकलेखक या संवर्गात वर्ग केले. तसेच त्याला कार्मिक विभागात रुजू करून घेतले गेले.

दरम्यान, राजेश पाटील याने दहावी व बारावीची बनावट गुणपत्रिका व बनावट प्रमाणपत्र सादर करून सुरक्षा रक्षक या पदावरून लिपीक-टंकलेखक या पदावर बढती घेतल्याची निनावी लेखी तक्रार एप्रिल-2014 मध्ये सिडकोच्या दक्षता विभागाला प्राप्त झाली. यानंतर कार्मिक विभागाने राजेश पाटील याला दहावी व बारावीची मूळ शैक्षणिक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. यानंतर सादर करण्यात आलेल्या प्रमाणपत्रामंध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. त्यावेळी सिडकोच्या दक्षता विभागानेही राजेश पाटील याने सादर केलेल्या सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्रांची नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पडताळणी करून घेतली.

हेही महत्वाचे...क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

फसवणूक आणि बनावटगिरी 
त्यावेळी राजेश पाटील याने सादर केलेल्या सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्रे बनावट असल्याचा अहवाल गुन्हे शाखेने दिला. यानंतर सिडकोच्या कार्मिक विभागाने राजेश पाटील याला निलंबित करून त्याच्याविरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राजेश पाटील विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.