जुहू चौपाटीवरील जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मागील पाच महिन्यांपासून वाशी जुहू चौपाटी येथील जॉगिंग ट्रॅक स्टेनलेस स्टीलची रेलिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता; मात्र आता हे काम पूर्ण झाल्याने तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. 

नवी मुंबई : मागील पाच महिन्यांपासून वाशी जुहू चौपाटी येथील जॉगिंग ट्रॅक स्टेनलेस स्टीलची रेलिंग आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता; मात्र आता हे काम पूर्ण झाल्याने तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाशी जुहू चौपाटीवरील जॉगिंग ट्रॅक आणि वाशी सेक्‍टर- ८ पंप हाऊसजवळील संलग्न असा जॉगिंग ट्रॅक मागील पाच महिन्यांपासून दुरुस्ती आणि रेलिंग बसविण्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र हे काम पूर्ण झाले असल्याने हा मार्ग आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. याच मार्गावर ११ एप्रिल २०१९ रोजी धोकादायक पादचारी पूल कोसळण्याची घटना घडली होती. यात दोन जण जखमी झाले होते. 

या प्रकरणी कामात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत विशाल सूर्यवंशी व यशवंत कापसे या दोन कनिष्ठ अभियंत्यांवर तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. या मार्गावरील जॉगिंग ट्रॅक दुरुस्ती आणि स्टेनलेस स्टील बसवण्याच्या कामाचा ८ मार्च २०१९ रोजी कार्यादेश देऊनही हे काम सुरू करण्यात आले नव्हते. वेळीच काम हाती घेतले असते, तर दुर्घटना टाळता आली असती. त्यामुळे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, त्यानंतर या कामाला जलदगतीने सुरुवात झाली व सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग मागील पाच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी सकाळी जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. मात्र, या मार्गाची दुरुस्ती आणि स्टेनलेस स्टीलची रेलिंग बसविण्याचे काम ठेकदाराने निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे. त्यामुळे हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जुहू चौपाटीवर नित्याने जॉगिंगसाठी येतो; मात्र मागील पाच महिन्यांपासून हा मार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने अर्धवट जॉगिंग करावी लागत असे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांमध्ये घट झाली होती; मात्र आता येथील काम वेळेत पूर्ण केल्याने हा मार्ग पुन्हा पूर्ववत सुरू झाला आहे. त्यामुळे जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.
- दिनेश म्हात्रे, अध्यक्ष, तुर्भे गाव कृती समिती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jogging track on Juhu Chowpatty open to citizens