सुलभ प्रवासासाठी कोस्टल रोडवर ‘आंतरजोड’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मुंबई - सागरी किनारी मार्गावर (कोस्टल रोड) प्रवास करणाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार मार्ग बदलता यावा किंवा मार्गावरून बाहेर पडता येण्यासाठी मार्गावरील अमरसन्स उद्यान, हाजीअली आणि वरळी सी फेस अशा तीन ठिकाणी आंतरजोड सुविधा असणार आहेत. आंतरजोड सुविधेमुळे १८ मार्ग बदलण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. मार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि तिथून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकी नऊ पर्याय असतील.

दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग ते राजीव गांधी सागरी सेतूला जोडणाऱ्या ९.९८ किमी लांबीचा किनारी मार्ग मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार बांधण्यात येणाऱ्या तीनही आंतरजोडांची एकूण लांबी १३.८८ किलोमीटर असणार आहे. हाजी अलीतील आंतरजोड त्रिस्तरीय असून उंची २४ मीटर असणार आहे. वरळी सी फेसमधील दोनस्तरीय आंतरजोडाची जास्तीत जास्त उंची ११.३ मीटर असेल. अमरसन्स उद्यान परिसरातील एकस्तरीय आंतरजोडाची उंची ११.८ मीटर असणार आहे, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली.

खाऱ्या वाऱ्याचा परिणाम होणार नाही
किनारी मार्गावरील आंतरजोड समुद्रात आणि समुद्रालगतच्या भागात बांधण्यात येणार असल्यामुळे, त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्यांना ‘फ्यूजन बॉण्डेड इपॉक्‍सी कोटिंग’ किंवा ‘सिमेंट पॉलिमर कंपोझिट कोटिंग’ लावण्यात येणार आहे. आंतरजोडांच्या बाह्यपृष्ठ भागांवर वैशिष्ट्यपूर्ण रंगांचा थर देण्यात येणार असून त्यामुळे सळ्या आणि बाह्यपृष्ठ भागावर समुद्राच्या हवेचा आणि खाऱ्या पाण्याचा परिणाम होणार नाही.

आपत्कालीन मार्गिका 
सागरी किनारा रस्त्याच्या आंतरजोडातील प्रत्येक मार्गावर तीन मार्गिका असणार आहेत. प्रत्येक मार्गिका ३.५ मीटर रुंदीची आहे. २.५ मीटर रुंदीची तिसरी मार्गिका आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल.

पाऊस आणि लाटांचे पाणी सहज वाहणार 
पावसाचे किंवा भरतीवेळी येणाऱ्या लाटांचे पाणी आंतरजोडांवरून वाहून जाण्यासाठी प्रत्येक पर्यायी मार्गाच्या दोन्ही बाजूंना वैशिष्ट्यपूर्ण जलउत्सर्जन व्यवस्था तयार केली जाणार आहे.

Web Title: Journey Costal Road Inter Connection