जंक फूडचा विळखा वाढतोय !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

युवा पिढीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

ठाणे : महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांमध्ये जंक फूडची चांगलीच क्रेज दिसून येत असून या पदार्थांच्या नियमित सेवनामुळे हृदयविकार व मधुमेहासारखे आजार कमी वयात बळावण्याची शक्‍यता निर्माण होते. महाविद्यालयीन मुलींना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील "माय टर्फ हॉस्पिटॅलिटी' संस्थेने मुंबईत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ब्रेकफास्ट टाळण्याचे प्रमाण वाढत असून ही मुले जंक फूडच्या आहारी जात असल्याचे दिसून आले आहे. 

माय टर्फ हॉस्पिटॅलिटी या संस्थेमार्फत फक्त मुलींसाठी "ट्राईब स्टुडंट अकोमोडेशन'ची सुविधा देणारे ट्राईबचे संस्थापक योगेश मेहेरा सांगतात, "आम्ही जवळपास 309 महाविद्यालयीन मुलांना ब्रेकफास्टविषयी विचारले असता, आम्ही कॉलेज सुरू होण्याआधी दहा मिनिटे लवकर येतो व फूड्‌स्टॉलवर फ्रॅंकी अथवा चायनीज पदार्थ खाऊन घेतो, असे जवळपास 50 टक्के मुलांनी उत्तर दिले. ब्रेकफास्टमध्ये काय असावे, यावर विचारले असता सकाळी उठल्यावर पोट भरण्यासाठी आपण जे खातो तोच ब्रेकफास्ट, असे अनेक मुलांनी सांगितले.

शाळेतल्या उपाहारगृहातून जंक फूड बंद करण्याचा सरकारचा निर्णय काही प्रमाणात हे प्रमाण आटोक्‍यात आणू शकतो. परंतु 15 ते 22 वयोगटातील मुलांना आपण जंकफूडपासून कसे दूर ठेवणार? हा आजच्या पालकांना सतावणारा मोठा प्रश्न आहे. याचे गांभीर्य आपण मुलांना समजावले तरच त्यांच्या आयुष्यातून आपण जंक फूड हद्दपार करू शकतो, असे मेहेरा यांनी सांगितले. 

कमी वयात आजार 

आज शहरांमध्ये शिकलेल्या म्हणजेच सुशिक्षित नागरिकांमध्ये 100 पैकी 14 लोकांना मधुमेह, 25 लोकांना उच्च रक्तदाब; तर 12 लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. शिवाय हे आजार होण्याचे वयही मागील दोन दशकांमध्ये वयाची 25-30 वर्षे इतके खाली आलेले आहे. हे होण्याची दोनच महत्त्वाची कारणे म्हणजे लहान वयापासूनच बिघडलेल्या खाण्या-पिण्याच्या सवयी व नियमित व्यायामाचा अभाव. 

रोज सेवन केल्यास अपायकारक 

समोसा-कचोरी, वडापावसारखे जास्त तळले गेलेले पदार्थ, मैद्यापासून तयार होणारे बहुतेक सर्व बेकरी उत्पादित पदार्थ, चाट, पिझ्झा-बर्गर, नूडल्स, मंचुरियन, सॉफ्ट ड्रिंक्‍स, फ्रॅंकी, आईस्क्रीम, बर्गरचा समावेश जंक फूडमध्ये करता येईल. यातील काही पदार्थ प्रमाणात खाल्ले तर काही बिघडेल असे नाही; परंतु जर हे पदार्थ रोजच्या आहारात येत असतील तर ते फारच अपायकारक आहेत. 

शहरातील लहान मुले व तरुणाईचा ओढा जंक फूडकडे जास्त आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात अन्न बनवण्यापेक्षा झटपट उपलब्ध असलेले पदार्थ खाण्याकडे नवीन पिढीचा कल जास्त आहे. कारण त्यात वेळ वाचतो. एका जागी बसून खाण्याची गरज नसते आणि आकर्षक व चविष्टही लागतात. या झटपट पदार्थांना नाव मिळाले "जंक फूड'. जंक या इंग्रजी शब्दाचा अर्थ रद्दी असा होतो. या रद्दीला आपल्या जीवनात किती महत्त्व द्यायचे, हे प्रत्येक भारतीयाने ठरविण्याची वेळ आली आहे. 
- प्रतीक्षा कदम, आहारतज्ज्ञ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The junk food problem is growing in youngsters