हे काहीतरी नवीनच बरंका ! शो ऑफ करण्यासाठी तरुणाई काय करतेय पाहा तर..

हे काहीतरी नवीनच बरंका ! शो ऑफ करण्यासाठी तरुणाई काय करतेय पाहा तर..

नवी मुंबई : शालेय स्नेहसंमेलन, नाटकासाठी भाडे तत्वावर कपडे घेण्याची पद्धत आता, लग्न सराईत देखील पाहायला मिळत आहे. समारंभात अल्प दरात शोभा वाढविण्यासाठी या भाड्याच्या कपड्यांना पसंती दिली जात आहे. अनेकांना जवळच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात डिझायनर ब्राईडल लेहंगा घालण्याची इच्छा असते. एम्ब्रॉयडरी असलेला नवाबी घालण्याची इच्छा असते. पण बजेटमुळे अनेकजण असे कपडे विकत घेऊ शकत नाही. कारण हजारो-लाखो रुपये किमतीचा टॅग?

पण, आता त्याची चिंता सोडून द्या. कारण, लग्नासह विविध कार्यक्रमांसाठी कपडे भाड्याने घेण्यास पसंती दिली जात असून, त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. नवी मुंबईत जरी मोजक्‍या ठिकाणी भाड्याने कपडे मिळत असले, तरी अनेकजण थेट मुंबईतल्या भाड्याने कपडे देणाऱ्या व्यावसायिकांना गाठून महागडे कपडे कमी भाड्यात घेण्यास, पसंती दर्शवत आहे.

बहिणीच्या लग्नात भाड्याने कपडे घेतले आहे. 28 हजारांचे कपडे भाड्याने 3 हजाराला मिळाल्याने पैशांची बचतही झाली आणि राजेशाही थाटामध्ये मिरवताही आले. त्यामुळे माझी पसंती ही भाड्याच्या कपड्यांना आहे. 

- इच्छिता भोईर, ग्राहक. 

पूर्वी केवळ शाळेचे स्नेहसंमेलन किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे भाड्याने विकत घेण्याचा कल होता; परंतु आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळे डिझायनर कपडे अगदी कमी किमतीमध्ये भाड्याने मिळतात. तसेच अनेकांच्या मते वीस ते तीस हजाराचा लेहांगा घेऊन, तो फक्त जवळच्या नात्यातील लग्न समारंभासाठी वापरता येईल. विशेष म्हणजे एकदा घातलेला लेहंगा पुन्हा घातला जात नसल्याने, त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च पाण्यात गेल्यासारखे होते. त्यामुळे सध्या भाड्याच्या कपड्यांकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. वीस ते तीस हजाराचा लेंहेंगा अवघ्या तीन ते चार हजारात भाड्याने मिळत असल्याने पैशाची बचत तर होतेच, पण लग्नात महागड्या कपड्यात मिरवता ही येते. 

लग्न सोहळ्यासाठी कितीही खर्च केले तरी पैसे कमीच पडतात. मात्र, भाड्याने मिळणाऱ्या कपड्यांमुळे पंधरा हजाराची शेरवानी अवघ्या दीड हजार रुपयात मिळाली. 

- निखिल पाटील, ग्राहक 


लग्नापुर्वीच्या छायाचित्रीकरणास पसंती 

सध्या सिने कलाकारांची आलिशान लग्न, दुरचित्रवाहिनीच्या मालिकांमधील शाही विवाह सोहळ्यातील कपड्यांचा थाट सर्वांना भुरळ पाडतो. महागडे कपडे घेणे प्रत्येकाला शक्‍य होतेच असे नाही. म्हणून लोक एका दिवसासाठी कपडे भाड्याने घेतात. नवी मुंबईत हा कल वाढत असल्याचे विक्रेता संतोष सिंग यांनी सांगितले. याशिवाय शेरवानी, सुट, पठाणी आदी कपड्यांना देखील मागणी वाढली आहे. सध्या लग्नापुर्वीच्या छायाचित्रीकरणास पसंती दिली जात असल्याने, त्यासाठी किमान पाच ते सात प्रकारचे कपडे दोघा वधू-वरांना घ्यावे लागतात. मात्र, लग्नासाठी इतरही खर्च असल्याने, अनेक जण भाड्याने कपडे घेणे पसंत करतात. 

एक हजारांपासून आठ हजारांपर्यंत उपलब्ध 

लग्न समारंभ, लग्नापुर्वीचे छायाचित्रीकरण, संगीत, पार्टी, वाढदिवस, कार्यालयीन किंवा व्यावसायिकांचा औपचारिक-अनौपचारिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला साजेसे कपडे उपलब्ध होतात. यामध्ये शेरवानी, नवाबी, ब्लेझर, जोधपुरी, पठाणी, लेहंगा, डिझायनर साडी, इंडो पाश्‍चिमात्य सूट, टक्‍सीडो, नऊवारी साडी, कच्छीकाम, काचकाम, गोंडे, घागरा, डबल थर असलेला घागरा या कपड्यांना मागणी असते. या कपड्यांचा दर एका दिवसासाठी एक हजार रुपयांपासून आठ हजार रुपयांपर्यंत असतो. 

Webtitle : just to show off see what youngsters are doing in mumbai and navi mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com