कालिना कॅम्पसकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा दर्जा व प्रतिष्ठा कायम राखण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. विद्यापीठाच्या सांताक्रूझ कालिना कॅम्पसच्या अनेक इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून नवीन इमारती भोगवटा प्रमाणपत्र आणि निधीअभावी धूळ खात आहेत.

मुंबई - दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा दर्जा व प्रतिष्ठा कायम राखण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. विद्यापीठाच्या सांताक्रूझ कालिना कॅम्पसच्या अनेक इमारतींची दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती जीर्ण झाल्या असून नवीन इमारती भोगवटा प्रमाणपत्र आणि निधीअभावी धूळ खात आहेत.

कालिना कॅम्पसमध्ये सुमारे ५६ विभाग आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ग याच इमारतींमध्ये भरतात. विविध अभ्यासक्रमांची ग्रंथसंपदा असलेल्या कॅम्पसमध्ये जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे. इमारतींच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दुसरी जागा नसल्याने जीव मुठीत घेऊन शिकावे लागत आहे. वर्गात प्राध्यापकांना बसण्यासाठीही जागा नाही. 

वसतिगृहाचीही पडझड झाली आहे. इमारतींच्या दुरुस्तीची वारंवार मागणी केली जात असून प्रशासन सुस्त असल्याचा आरोप माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे.

विभागांना हवी जागा
मास मीडिया अभ्यासक्रम सध्या हेल्थ सेंटर इमारतीत सुरू झाला आहे. पाली, गांधी स्टडी सेंटर, फुले-आंबेडकर अध्यासन या विभागांना हक्काची जागा नसल्याने इतर विभागांमध्ये अभ्यासक्रम चालवले जात आहेत.

फोर्ट इमारतीचीही दुरवस्था
मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील इमारतीलाही गळती लागली आहे. दुसऱ्या मजल्यावर पाण्याची गळती होत आहे. 

कॅम्पसच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.
- संजय वैराळ, माजी सिनेट सदस्य

‘नॅक’ मूल्यांकन रखडल्याने निधी अडकून
मुंबई विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन रखडले आहे. वर्षभरापासून विद्यापीठाला ‘नॅक’चा दर्जा नाही. विद्यापीठाला २१ एप्रिल २०१२ मध्ये ‘नॅक’चा दर्जा मिळाला. २० एप्रिल २०१७ पर्यंत ही श्रेणी होती. ती टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा प्रक्रिया झालीच नाही.

नव्या तयार असलेल्या इमारती
लेक्‍चर सेंटर
परीक्षा भवन
आयटी भवन
लिंग्वेस्टिक इमारत
 महिला वसतिगृह

पडझड झालेल्या इमारती
जवाहरलाल नेहरू लायब्ररी
टिळक भवन
रानडे भवन
लेक्‍चर कॉम्प्लेक्‍स
विद्यार्थी हॉस्टेल

Web Title: Kalina campus issue