Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सभेसाठी कल्याण-भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण मध्ये दुपारी 1 वाजल्या पासूनच सभेच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sakal

डोंबिवली - आग ओकणारा सूर्य, रणरणते ऊन, घामाच्या धारांनी हैराण झालेले असताना देखील भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने कल्याण मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी उपस्थित झाले. कार्यकर्त्यांमध्ये महिला, पुरूषांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला.

गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभेच्या वेळी नागरिक जोशात जय श्री रामाचा नारा देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण मध्ये दुपारी 1 वाजल्या पासूनच सभेच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरू झाली होती.

रणरणत्या उन्हात देखील नागरिक महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सभेच्या ठिकाणी येत होते. कल्याण व भिवंडी मतदारसंघातील शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, शहरी भागातील सामान्य महिला, पुरूष नागरिकांना ‘बांधिव’ कार्यकर्ते म्हणून विशेष बस उपलब्ध करून सभास्थळी आणले गेले.

मोदी यांची सभा 3 ला असल्याने 12 वाजल्यापासून नागरिक यायला सुरुवात झाली. सभा 5 ला होणार असल्याचे सांगण्यात आले. सभेला दोन तास उशीर होणार असल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

तरी नागरिक सभा मंडपात बसून वाट पहात होते. रणरणत्या उन्हात प्रवास करून आलेल्या कार्यकर्त्यांना आच्छादित सभा मंडपामुळे काहीसा दिलासा मिळला. मंडपात सर्वत्र पंखे, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली होती. नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

उत्साही कार्यकर्ते सभा मंडपात मोदी, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपील पाटील, कल्याणचे लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. काही कार्यकर्ते वाजतगाजत सभास्थळी येत होते. भगवे झेंडे, फलकांमुळे सभा स्थळ परिसर भगवामय झालेला पहायला मिळाला.

सभेमुळे कल्याण शहर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. जागोजागी पोलीस जथ्थ्याने उभे होते. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती. सुरक्षेचा त्रास नको म्हणून कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवला.

पंतप्रधान मोदी येणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा रस्तारोधक आणि या भागातील सर्व दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. पक्की दुकाने, बांधकामे यांच्यावर हिरव्या जाळ्या लावून ती बंदिस्त करण्यात आली आहेत. मोदींच्या मार्गाच्या दुतर्फा एकही माणूस फिरकणार नाही असे नियोजन करण्यात आले होते.

सभेसाठी प्रशासनाने वितरित केलेल्या प्रवेश पासाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिला सभेच्या ठिकाणी सोडले जात नव्हते. सभा मंडपाचा 500 मीटरचा परिसर, रस्ते बांबूचे अडथळे, रस्ता रोधक लावून बंद करण्यात आले होते. त्यामुळे सभा स्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, तसेच सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना अर्ध्या वाटेत रिक्षा, वाहन सोडून मग पायी यावे लागत होते.

सेल्फी पॉईंट गर्दी

सभा मंडपाच्या बाजूला राम मंदिराची प्रतिकृती, तसेच पंतप्रधान मोदी यांची उभी प्रतिमा लावण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी जाऊन कार्यकर्ते राम मंदिराच्या प्रतिकृती सोबत, आणि मोदी यांच्या प्रतिमेसोबत स्वतःचे मोबाईल मध्ये सेल्फी काढून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

मोदी येताच घोषणांनी दणाणले सभामंडप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच 'जय श्री राम, जय श्री राम, मोदी जी को जय श्री राम' 'मोदी, मोदी' असा जयघोष करण्यात आला. भारतमाता की जयचा जय जयकार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com