कल्याण-डोंबिवलीत रेकॉर्ड ब्रेक ; नदी-खाडी किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कल्याण पूर्वजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना स्टेशन गाठावे लागले, तर रेल्वेस्थानकाच्या 4, 5, 6 फलाटांजवळील रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळित झाली. त्याचा प्रवाशांना त्रास झाला. 

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरी-ग्रामीण भागात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक पावसाने हजेरी लावल्याने जागोजागी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, पालिका हद्दीतील सखल आणि नाल्याशेजारील, खाडीकिनारी, नदीशेजारील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत. 
आज सकाळी 7 ते दुपारी 2 या कालावधीत 168 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

सकाळी पडत असलेल्या मुसळधार पावसाने गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहनचालक, महिला, नोकरवर्ग, विद्यार्थी वर्गाला त्रास सहन करावा लागला. वरप गाव आणि रायतेजवळील पुलाला तडे गेल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावर वाहनांची रांग लागली होती. 

नागरिकांचे ठिय्या आंदोलन 

कल्याण पूर्व आमराई परिसरातील जीवन छाया सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, तिसाई चाळीतील घरात गुडघाभर पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पालिकेच्या कल्याण पूर्व "ड' प्रभाग क्षेत्र कार्यालयामधील आपत्कालीन कक्षाला कळवून ही मदत न मिळल्याने संतप्त नागरिकांनी प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले. मुसळधार पाऊस असल्याने तेथे अधिकारी नव्हते. अखेर आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना फोन केल्यानंतर त्या परिसरात मदतीला सुरुवात करण्यात आली. 

25 झाडे कोसळली 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 25 हून अधिक झाडे कोलमडली. ती बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. कल्याण पूर्वमधील "ड' प्रभाग क्षेत्र परिसरात एक भिंत पडली. यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नाही. 

एक जखमी 

नांदवली परिसरात विजेचा खांब कोसळला. त्यात मुस्कान शिवकुमार राजोरिया (17) हिला शॉक लागल्याने ती जखमी झाली. तिच्यावर पालिकेच्या रुक्‍मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रेल्वे सेवा विस्कळित 

कल्याण पूर्वजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना स्टेशन गाठावे लागले, तर रेल्वेस्थानकाच्या 4, 5, 6 फलाटांजवळील रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळित झाली. त्याचा प्रवाशांना त्रास झाला. 

Web Title: Kalyan-Dombivli Record Break