कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद : Kalyan Leopard News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopord

Kalyan Leopard News: कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला आणि एकच खळबळ उडाली. श्रीराम अनुग्रह सोसायटीत सकाळी 10 वाजता बिबट्याने शिरकाव केला आणि वन विभागाने त्याला जागीच स्थानबद्ध केलं. तेव्हापासून त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र तो सतत ठिकाण बदलून पथकाला चकवा देत होता. अखेर 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमनं त्याला जेरबंद केलं. टीमने बिबट्यास पकडताच नागरिकांनी जल्लोष करत टीमचे आभार मानले. (Kalyan Leopard News Leopard finally rescued after 10 hours)

हेही वाचा: Shradhha murder Case: मोठी अपडेट! वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या शरिराचे केले तुकडे; अफताबचा खुलासा

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. हनुमान नगर परिसरात आधी तो नागरिकांना दिसला होता. त्यानंतर काटेमनिवली येथील चिंचपाडा परिसरात तो शिरला. गुरुकृपा सोसायटीत 20 मिनिटे फिरल्यानंतर तो श्रीराम अनुग्रह सोसायटीमध्ये शिरला. याची माहिती तोपर्यंत कल्याण वन विभागास मिळाली. कल्याण व बदलापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सोसायटी परिसरातच स्थानबद्ध केले. ठाणे वनविभाग, बोरिवली नॅशनल पार्कचे सहाय्यक वन अधिकारी, स्थानिक पोलीस यांसह वॉर, पॉझ या प्राणीमित्र संघटनेचे असे सुमारे 150 हून अधिक कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यात लागले. त्यानंतर ठाणे वन विभागाच्या सहाय्यक वन संरक्षक गिरीजा देसाई व बोरिवली नॅशनल पार्कचे वन अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे हे घटनास्थळी दाखल झाले. अखेर संध्याकाळी 6.15 च्या सुमारास बिबट्यास डार्ट देत जेरबंद करण्यात आले. ही मोहीम फत्ते झाल्याने स्थानिक रहिवाशासह उपस्थित वन विभाग कर्मचारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, बघ्यांनी सुटेकचा निश्वास सोडला.

4 वर्षापेक्षा मोठा नर जातीचा बिबट्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथक यांना सकाळी 11 वाजता माहिती मिळाली होती की बिबट्या एका सोसायटीमध्ये अडकला आहे. आमची पूर्ण टीम सकाळी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर असं समजलं की फार अडचणींचा असा रेस्क्यू होता. इमारतीचा आराखडा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. प्रत्येक जागा ही अडचणीची जागा होती. बिबट्याला जेरबंद करण्याचे अनेक प्रयत्न केले यामध्ये आमचा एक कर्मचारी जखमी देखील झालं. अखेर सायंकाळी 5.30 च्या सुमारास बिबट्या आमच्या टार्गेटमध्ये आला आणि आम्ही त्याला पकडले. तो फार अग्रेसिव्ह असल्यानं पकडण्यात थोडा वेळ लागला. ताब्यात आल्यानंतर या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू सेंटर इथं हलविण्यात आलं आहे, अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक अधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.

टॅग्स :Mumbai NewsThaneLeopard